सांगली : मिरज येथे गर्दूल्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजू शंकर जाधव (वय ३०, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर अतुल बाळू कोळी (३९, रा. शेरे ता. कऱ्हाड जि. सातारा) असे मृताचे नाव होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के मलाबादे यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. ५ जानेवारी २०२० मध्ये मिरजेत ही घटना घडली होती. आरोपी राजू जाधव हा मिरज येथील मंगल टॉकीजजवळ असलेल्या, जूने बंद पडलेल्या पीएम रूमच्या मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहात रात्री झोपत असे. घटनेच्या दोन दिवस अगोदर जाधव एकदा तिथे झोपला असताना मृत कोळी याने त्याला दगड मारला होता. ५ जानेवारी रोजी आरोपी झोपत असलेल्या स्वच्छतागृहात कोळी झोपला होता. योवळी जाधव याने त्याच्या डोकीत दगड घालून त्याचा खून केला. या खटल्यात सरकारपक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी संजय शिवाजी पाटील, साक्षीदार अरूण लोंढे, वैद्यकीय अधिकारी सुरेखा गावडे, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या साक्षी ग्राह्य धरून शिक्षा सुनाविण्यात आली.
मिरजेत गर्दूल्याच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल
By शरद जाधव | Published: May 11, 2023 5:06 PM