सांगली : रत्नागिरी - नागपूर महामार्गावरून बेभान धावणारी वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. नागज फाटा ते तानंग फाटा या महामार्गाच्या या टप्प्यात सध्या दररोज एक-दोन गंभीर अपघात होत आहेत. सरासरी आठवड्याला दोघा-तिघांचा बळी जात आहे.महामार्ग झाला, पण त्याची शिस्त पाळण्याची सवय वाहनचालकांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वन वे मधून वाहन दामटण्याने सर्वाधिक अपघात झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग वापरता पादचारी दुभाजकावरून जातात. दुचाकी वाहनेही बिनधास्तपणे दुभाजकावरून पलीकडे नेली जातात.काही दिवसांपूर्वी एक महाभाग पहारीने चक्क दुभाजक फोडताना दिसला. दुचाकीसाठी रस्ता बनविण्याचा त्याचा प्रयत्न होत. १०० टक्के महामार्ग अधिकृतरीत्या सुरु झाला नसल्याने पोलिसांची गस्तही पूर्ण क्षमतेने सुरु नाही. सध्या फक्त बोरगाव पथकर नाक्याजवळच पथक थांबल्याचे दिसते.
खरशिंग फाटा डेंजर झोनखरशिंग फाटा (महामार्ग लगतचा दंडोबाचा डोंगरपायथा) सध्या डेंजर झोन बनला आहे. तेथे तीव्र वळण आहे. महामार्गावर १०० च्या गतीने धावणारी वाहने या वळणावर नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावर धडकतात. खरशिंगकडून महामार्गावर येणारी वाहनेही अचानकपणे भरधाव वाहनांसमोर अवतरतात. यामुळेही अपघात होत आहेत. पंढरपूरकडून येणारी वाहने खरशिंगच्या वाहनचालकांना दिसत नाहीत. आतापर्यंत सर्वाधिक अपघात याच फाट्यावर झाले आहेत.
दोन ठिकाणी स्पीडगणमहामार्गावर कमाल गती मर्यादा ८० किलोमीटर प्रति तास आहे. पण महामार्गाचे वारे कानात शिरलेले वाहन चालक १०० ते १२० च्या गतीने गाड्या दामटळतात. त्यांच्यावर नियंत्रणासाठी शिरढोण आणि भोसे जवळ स्पीडगण बसविल्या आहेत. गती मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनाला टिपून दंडाची कारवाई तत्काळ होते. वाहनाच्या क्रमांकावरुन मालकाला अवघ्या पाचच मिनिटात दंडाचा संदेश मोबाइलवर जातो. दंडाची रक्कम सरासरी दोन हजार रुपये आहे.दररोजचे पथकर संकलन सव्वासात लाखावरमहामार्गावर वाहतूक आता चांगलीच वाढली आहे. बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) पथकर नाक्यावर दररोजची वसुली सरासरी सात ते सव्वासात लाख रुपयांवर पोहोचली आहे. पुढे अनकढाळ, इंचगाव नाक्यांवर याहून अधिक संकलन होते. अंकली-मिरज-तानंग फाटा हा उर्वरित महामार्ग पूर्ण झाल्यावर वाहतूक आणखी वाढेल. त्याच्या बरोबरीने अपघातही वाढण्याची भीती आहे.
ही आहेत अपघातांची कारणे
- वन वे मध्ये बिनधास्त घुसणे
- महामार्ग खालील भुयारी मार्गात भन्नाट वेगाने गाड्या पळविणे
- दुभाजकावरून रस्ता ओलांडणे
- चुकीच्या ठिकाणी पार्किंग
- बोरगाव टोलनाका परिसरही धोक्याचा बनला आहे.