सांगली : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचे मोटारीतून अपहरण करताना विरोध करणाऱ्या मुलीच्या आईवर कोयत्याने खुनी हल्ला केल्याचा प्रकार सांगलीत घडला. या अपहरणानंतर सांगली शहर पोलिस व गुन्हे अन्वेषणचे पथकाने हरिहर (कर्नाटक) येथे जाऊन १२ तासांच्या आत मुलीची सुटका केली.
याप्रकरणी समर्थ भारत पवार (वय २२, जुना बुधगाव रस्ता, राजीव गांधी नगर), राहुल संजय साळुंखे (वय १९), आदित्य गणेश पवार (वय २०, दोघे रा. जामवाडी), शुभम नामदेव पवार (वय २२, श्रीनिवास अपार्टमेंट, गावभाग) यांना अटक केली. तसेच अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित समर्थ पवार हा सांगलीतील एका मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. गुरूवारी सायंकाळी तो आणि साथीदार मोटार (एमएच १० सीएक्स ६७९७) मधून मुलीच्या घरासमोर आले. कोयत्याने धाक दाखवून मुलीच्या आजोबांना ढकलून दिले. घरात घुसून मुलीच्या आजीला देखील कोयत्याचा धाक दाखवला. अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणार आहे, असे म्हणून जबरदस्तीने तिला घराबाहेर ओढत आणले.त्यानंतर मोटारीत बसवून नेत असताना तेथे आलेल्या मुलीच्या आईने विरोध केला. तेव्हा समर्थ याने कोयत्याने आईच्या डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी केले. आई जखमी झाल्यानंतर मुलीला घेऊन संशयित निघाले. या प्रकाराने परिसरात घबराट निर्माण झाली होती.शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक अभिजीत देशमुख व गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथके शोधासाठी पाठवली. उपनिरीक्षक महादेव पोवार व गुन्हे अन्वेषणचे पथकाने अपहरणकर्ते व मुलीच्या ठावठिकाण्याबाबत माहिती काढण्यास सुरूवात केली. तेव्हा सर्वजण कर्नाटकात गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने हरिहर (कर्नाटक) येथे जाऊन मुलीची सुखरूप सुटका केली. पाच जणांना ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त केली.
संशयित समर्थ पवार, राहुल साळुंखे, आदित्य पवार, शुभम पवार या चौघांना अटक केली आहे. तर अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे. अटकेतील चौघांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
संयुक्त पथकाची कारवाईशहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर गोडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, संदीप गुरव, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली. अवघ्या १२ तासांच्या आत मुलीची सुटका केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालकांनी पोलिसांचे अभिनंदन केले.