सांगली : अन्न व औषध प्रशासनाने एका टेम्पोमधून भेसळ व कमी दर्जाच्या संशयावरून तीन लाख ३८ हजार रुपये किमतीचा एक हजार किलो दूध पावडरचा साठा जप्त केला. ही कारवाई बुधवारी मिरजेतील गांधी चौकात करण्यात आली. या प्रकारामुळे मिरज, सांगली परिसरात खळबळ उडाली. अन्न, औषध प्रशासनाने बुधवारी मिरज व गांधी चौकात तपासणी केली. गांधी चौकात थांबलेल्या टेम्पो (क्रमांक एमएच १०, झेड ३५५४) मधून दूध पावडरची वाहतूक केली जात होती. पथकाने या टेम्पोची तपासणी केली. तसेच चालक अब्दुल रजाक शिराज मुल्ला याच्याकडे अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वाहतूक परवान्याची मागणी केली. पण त्याच्याकडे वाहतूक परवाना नव्हता. पथकाला दूध पावडरबाबत भेसळीचा व कमी दर्जाचा संशय आला. टेम्पोतील ३ लाख ३८ हजार रुपये किमतीचा एक हजार किलोचा साठा पथकाने जप्त केला. गेल्या काही वर्षात झालेली ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी एम. ए. सौदागर, रा. म. खंडागळे, ए. ए. पवार, नमुना सहायक श्री. साबळे यांनी भाग घेतला. पुढील तपास सहायक आयुक्त द. ह. कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (प्रतिनिधी)
एक हजार किलो दूध पावडर जप्त
By admin | Published: November 19, 2015 12:21 AM