शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेले चार दिवसात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा एक टीएमसी पाणीसाठा जास्त झाला आहे. धरणात एकूण ११.९२ टीएमसी तर ५.०४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी जूनअखेर एकूण पाणीसाठा १०.८८ टीएमसी होता. गतवर्षी पेक्षा ३६८ मिलिमीटर पाऊसही जादा पडला आहे.धरणातून ६७५ क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी लागल्याने ४५८९ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात पाथरपुंज येथे ५२, निवळे येथे ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज येथे आजअखेर १ हजार १८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.गतवर्षी कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्यापासून या धरणातून मागणीनुसार नदीपात्रात व कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येत होते. रविवारी तालुक्यात लहान मोठ्या सरी पडल्या. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. चांदोली धरण परिसरात १ जून पासून ५१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा, चांदोली धरण परिसर या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस हाेत आहे. धरणामध्ये पाण्याची ४५८९ क्यूसेकने आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गतवर्षी ३० जूनअखेर १४८ मिलिमीटर तर यावर्षी ५१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.सोमवारी सकाळपासून या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. दुपारी ४ पर्यंत पाथरपुंज येथे ११ मिमी, निवळे येथे २२ मिमी, चांदोली धरण परिसरात ६ मिमी, धनगरवाडा येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी ७ पर्यंत पडलेला पाऊस (कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये)
- चांदोली धरण : ५३ (५१६)
- पाथरपुंज : ५२ (११८८)
- निवळे : ७७ (९७९)
- धनगरवाडा : ४६ (५१३)
शिराळा तालुक्यातील मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
- कोकरूड : ७.३० (१४६.१०)
- शिराळा : ५.३० (१५३.१०)
- शिरशी : ११.८० (२७३.३०)
- मांगले : ११.३० (२०६.९०)
- सागाव : १०.५० (१५०.२०)
- चरण : ३९ (३७१.७०)