इस्लामपूर : इस्लामपूर-सांगली रस्त्यावरील वाळवा फाटा परिसरात दुचाकीला ओलांडल्याच्या कारणातून आरोग्य सेवेतील लिपिकास दगडाने मारहाण करून जखमी करणाऱ्यास येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी १ वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीची हमी देणारी अट आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
निलेश वसंत पाटील (रा. तुजारपूर) असे शिक्षा झालेल्या युवकाचे नाव आहे. दंडाची रक्कम जखमी शत्रुघ्न गायकवाड यांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मारहाणीची ही घटना जुलै २०१५ मध्ये घडली होती. गायकवाड हे उपजिल्हा रुग्णालयात लिपिक आहेत. काम संपवून ते दुचाकीवरून सांगली रस्त्याने घरी निघाले होते. वाळवा फाट्यावर रस्ता ओलांडत असताना निलेश पाटील याच्याशी वाद झाला. त्यावेळी निलेश याने गायकवाड यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले होते. हवालदार ए. एल. पवार यांनी गुन्ह्याचा तपास केला. सरकारी वकील भैरवी मोरे यांनी फिर्यादीतर्फे काम पाहिले. पोलीस संदीप शेटे यांनी खटल्याच्या कामकाजात सरकार पक्षाला मदत केली.