सांगली : चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम ८० ते ८५ टक्के पूर्ण झाले आहे. या पुलावरून एकेरी वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत सुरू होईल, असा विश्वास पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेश पाखरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच दिवाळीपूर्वी पुलाचे १०० टक्के काम पूर्ण होईल, असाही त्यांनी अंदाज वर्तविला आहे.सांगली ते माधवनगर रस्त्यावर चिंतामणीनगर येथे रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम १० जून २०२३ पासून सुरू झाले आहे. १० जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. या कालावधीत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मूळ रेल्वे पूल काढून तेथे नवीन रेल्वे पूल बांधण्यासाठी रेल्वेकडून १५ कोटी रुपयांची तरतूद होती. तोपर्यंत स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार दोन बोगदे आणि मूळ पुलाच्या रुंदीकरणाची राज्य शासनाकडून सूचना आली.त्यानुसार वाढीव कामाचा आराखडा करण्यासह मंजुरी मिळण्यास दोन महिने काम थांबले. वाढीव काम १० कोटींपर्यंतचे झाले. या सर्व कारणांमुळेच रेल्वे पुलाच्या कामाला उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाचे मत आहे. सध्या ८० ते ८५ टक्के काम पूर्ण असून, ३० सप्टेंबरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होईल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या कारणांमुळे पुलाचे काम लांबलेरेल्वेच्या कामात कधीही दिरंगाई होत नाही, असा नागरिकांचा विश्वास आहे. याबद्दल रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिंतामणीनगर रेल्वे पूल काढणे आणि नवीन बांधण्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद होती. कामाला सुरुवात केल्यानंतर रुंदीकरण, दोन बोगद्यांमुळे काम थांबले. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाढीव काम १० कोटी रुपयांचे झाले. या मंजुरीची कागदपत्रे येणे आणि निधी मिळण्यात अडचणी झाल्यामुळे काम थांबले होते. वाढीव काम करण्यामुळे पुलाचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही, असे रेल्वे प्रशासनाचे मत आहे.
रेल्वेला पाच कोटीच मिळालेसार्वजनिक बांधकाम आणि महापालिकेच्या वाढीव कामासाठी १० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. हा सर्व निधी रेल्वेकडे भरल्यानंतर कामाची निविदा काढण्यासह सर्व प्रक्रिया राबविण्यात येते. पण, महापालिका आणि बांधकाम विभागाकडून आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरित पाच कोटी आजही मिळाले नाहीत. तरीही प्रवाशांची गैरसोय नको, म्हणून रेल्वे प्रशासन पुढाकार घेऊन काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उशिर का झाला?जून, जुलै महिन्यात संततधार पाऊस झाला. या पावसामध्ये काम करणे पुलाच्या मजबुतीसाठी धोकादायक आहे. कारण, मातीत पाणी मुरत असतांना काम करणे चुकीचे असल्यामुळे हळूहळू काम सुरू होते. पावसाने उघडीप दिल्यापासून पुलाचे काम गतीने सुरू आहे. एकरी वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत चालू होणार आहे. त्यादृष्टीने काम पूर्ण झाले आहे, असे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेश पाखरे यांनी सांगितले.
जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे पूल थांबवाचिंतामणीनगर पुलाचे काम युद्धपातळीवर चालू आहे. पुलाच्या कामात घाईगडबड नकोच, असे अभियंत्यांचे मत आहे. चिंतामणीनगरच्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे पुलाचे काम सुरू करू नये, असेही अभियंत्यांचे मत आहे.