लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिक्षक बँकेची रविवारी झालेली ऑनलाईन सभा कोणत्याही गोंधळाविना शांततेत पार पडली. दरवर्षीच्या सभेतील गुरुजींची गुद्दागुद्दी ऑनलाईनमुळे यावर्षी टळली. सभासदांच्या भावनांचा विचार न करता, आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.
या ऑनलाईन सभेमुळे सभासदांना आपले मुद्दे, आक्षेप, सूचना ताकदीने मांडता आल्या नाहीत. अध्यक्ष सुनील गुरव म्हणाले की, बँकेचा पाच वर्षांमधील कारभार अतिशय चांगला असून, सभासद हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. सभासदांनी त्याचे स्वागतही केले आहे. गुरव यांनी सभेतील सर्व ठराव सभासदांनी मंजूर केल्याचे जाहीर केले. या सभेला सुमारे एक हजार सभासदांनी ऑनलाईन उपस्थिती लावल्याचा दावाही त्यांनी केला. बँकेची ६८ वी सर्वसाधारण सभा डेक्कन बँकेचे अध्यक्ष गुळवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व संचालक उपस्थित होते. सुनील गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी नोटीस वाचन केले. व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचला. सुनील गुरव यांनी विषयांचे वाचन करून मंजुरी देण्याचे आवाहन सभासदांना केले.
यावेळी विरोधी गटाचे विनायक शिंदे, अविनाश गुरव यांनी ठरावांवर सभासदांच्या ऑनलाईन प्रतिक्रिया घेण्याची मागणी केली. त्यांच्या शंकांचे समाधान करावे, भूमिका जाणून घ्यावी, असे आवाहन केले. ऑनलाईन कमेंटमध्ये सभासदांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यांचा विचार व्हावा, अशी मागणी केली. परंतु, अध्यक्ष गुरव यांनी सर्व विषय वाचून संपवले. सभासदांचा आवाज दाबत आहात, ऑनलाईन सभासदांचे मतही विचारात घेत नाहीत, त्यामुळे आम्ही निषेध करतो, असे म्हणत निषेधाच्या घोषणा देत विरोधी गटाच्या संचालकांनी सभात्याग केला.
चौकट
सभेतील ठराव असे
सेवानिवृत्तीनंतरही सभासदत्व कायम ठेवणे, सभासद सेवकांच्या कर्जामधून सहा टक्क्यांऐवजी पाच टक्के शेअर्स वर्गणी कपात करणे, मागणीनुसार कायम ठेव परत करणे, मृत सभासदांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज मृतसंजीवनी योजनेतून माफ करून उर्वरित रक्कम वारसांना देणे हे ठराव मांडण्यात आले.
चौकट
सभासदांचे पाठबळ नसल्याने विरोधकांचा पळ : गुरव
सर्वसाधारण सभेतही सभासद हिताचेच अनेक ठराव घेण्यात आले. या सगळ्याला सभासदांमधून मिळालेले प्रचंड पाठबळ व सभासद हित न बघवल्यानेच विरोधी संचालकांनी सभेतून पळ काढला. सर्वसाधारण सभा ही सभासदांसाठी असते. संचालकांना बोलण्याची, निर्णय घेण्याचा संधी संचालक मंडळाच्या सभेत असते. तिथेच त्यांनी बोलावे, याचेही भान विरोधकांना नाही. या सभेतून पळ काढत विरोधी गटाच्या संचालकांनी संचालकपदाच्या दर्जाचा अवमान केला, असा आरोप बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव यांनी केला.
चौकट
सभासदांचा आवाज दाबला : विनायक शिंदे
शिक्षक बँकेची यावर्षीची सर्वसाधारण सभा ही सभासदांसाठी नव्हे तर केवळ सत्ताधारी संचालक मंडळासाठी झाली. या ऑनलाईन सभेत कोणत्याही सभासदाची प्रतिक्रिया विचारात न घेता, केवळ ‘मन की बात’ मांडण्याचे काम बँकेच्या अध्यक्षांनी केले. मुळातच दहा टक्केही सभासद ऑनलाईन नव्हते. सभासदांचा आवाज दाबला गेला. त्यामुळे अशी सभा काय कामाची? त्यामुळे आम्ही सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला. या सभेत एकाही विषयाला सभासदांनी मंजुरी दिलेली नाही. तशी कोणतीही खात्री अध्यक्षांनी केली नाही, असा दावा विनायक शिंदे, अविनाश गुरव यांनी केला.