घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : विश्रामबाग येथील एका वृद्धास तोतया पोलिसाने तुमच्यावर गुन्हे दाखल असल्याची भीती घालून कारवाई टाळण्यासाठी सात लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अरविंद गंगाधर किल्लेदार (वय ८५, रा. सुखवास्तू, त्रिमूर्ती बंगला, गव्हर्मेंट कॉलनी, विश्रामबाग) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अरविंद किल्लेदार हे दि. १ जुलै रोजी दुपारी २ च्या सुमारास घरी होते. त्यावेळी त्यांना एक कॉल आला. मुंबई येथील टेलिफोन कार्यालयातून बोलत असल्याचे भामट्याने त्यांना सांगितले. तुमच्या नावावर बनावट सिम कार्ड वापरून लोकांची फसवणूक सुरू आहे. त्या सिम कार्डचा वापर मनी लाँड्रिंगसाठी होत असून, देशविरोधी संदेशदेखील सिम कार्डच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहेत. या प्रकरणी तुमच्या विरोधात मुंबईतील टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्हाला पोलिस ठाण्यातून अधिकाऱ्यांचा कॉल येईल, असे भामट्याने किल्लेदार यांना सांगितले.
काही वेळाने तोतया पोलिस अधिकारी विनायक बाबर नावाने कॉल आला. त्याने किल्लेदार यांना तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यात असंख्य तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे चौकशीसाठी दोन तासांत पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. किल्लेदार यांनी सांगलीत राहत असून, वृद्ध असल्यामुळे पोलिस ठाण्यात येऊ शकत नसल्याचे तसेच या प्रकाराशी काही संबंध नसल्याचे सांगितले. तेव्हा समोरील तोतया अधिकाऱ्याने हा गुन्हा तुम्ही प्रत्यक्ष केलेला नाही. त्यामुळे तुम्ही यातून सुटू शकता, परंतु, त्यासाठी तातडीने दिलेल्या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या किल्लेदार यांनी त्यांच्याकडे पैसे पाठविण्याची ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे बॅँकेत जाऊन किती रक्कम आहे ते पाहिले. बँकेत खात्यावर सात लाख रुपये होते. काही वेळाने त्यांना पुन्हा दूरध्वनी आला. तोतया अधिकाऱ्याने त्यांना ‘एमवायके एंटरप्रायजेस’ नावाच्या एसबीआय शाखा रामपूर गार्डन या खात्यावर सात लाख रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार किल्लेदारांनी सात लाख रुपये त्या खात्यावर वर्ग केले. हा सर्व प्रकार सुरू असेपर्यंत समोरील व्यक्तीचा मोबाइल कॉल सुरूच होता.
सायबर पोलिसांकडे गुन्हा
किल्लेदार यांनी मित्र नरहरी कुलकर्णी यांना भेटून हा प्रकार सांगितला. तेव्हा कुलकर्णी यांनी किल्लेदार यांना तुमची फसवणूक झाल्याचे सांगितले. किल्लेदार यांनी बँकेत चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.