सांगली : कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात २३ जून ते १० जुलै या कालावधीत माजी विद्यार्थ्यांची ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. बुधवारी उद्घाटनाचे पुष्प ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सहाय्यक संचालिका अश्विनी जाखलेकर यांच्या व्याख्यानाने गुंफण्यात आले. चीनमधील शांघाय येथील संशोधिका डॉ. स्नेहा गोकाणी यांचेही व्याख्यान झाले.
लठ्ठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांतीनाथ कांते यांनी सांगितले की, महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी अनेक शासकीय व खासगी संस्थांत मोठ्या पदांवर आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा या हेतूने आयोजन केले आहे. व्याख्यानमालेअंतर्गत २२ कार्यक्रम होणार आहेत. जाखलेकर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर मार्गदर्शन केले. ‘प्रशासकीय सेवेतील आव्हाने व संघर्ष’ या विषयावर विवेचन केले. डॉ. गोकाणी अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या क्षेत्रातील संधींची माहिती त्यांनी दिली.
संस्थेचे सचिव सुहास पाटील यांनी उदघाटन केले. संस्थेचे अध्यक्ष शांतीनाथ कांते अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. पी. एन. गोरे, डॉ. एस. जी. खडके, उपप्राचार्य डॉ. एम. डी. हनमणे, पी. एन. चौगुले आदींनी संयोजन केले.