जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सभागृह आरोळ्यांनी दणाणून सोडणाऱ्या भाऊ-बापू-अण्णांची लॉकडाऊनमुळे नाकेबंदी झालीय. व्हिडीओ कॉन्फरन्सवरच्या सभा म्हणजे जणू तांबड्या रश्श्याची भूक सपक वरणावर भागवण्यासारखाच प्रकार! त्यातूनही काही नेतेमंडळींनी ऑनलाईन सभेतही डरकाळ्या फोडण्याचा प्रयत्न केलाच. जतमधले एकजण घरात मोबाईल समोर ठेवून स्क्रीनवर दिसणाऱ्या अधिकाऱ्यांवर तोफगोळे डागायचे म्हणे. घरच्यांसाठी सुरुवातीला या डरकाळ्या म्हणजे नेतेगिरीचा अविष्कार वाटला, पण दर महिन्याला तीन-चार तास हा दंगा घरात सुरु राहिल्यावर मंडळी वैतागली. ते घर असल्याची आठवण करुन देऊ लागली. यामुळे भानावर आलेले साहेब आता मळ्यातल्या वस्तीवरून ऑनलाईन राहतात म्हणे!
लॉकडाऊनमधल्या पळवाटा
लॉकडाऊनमुळे गेले दीड वर्ष व्यापारीपेठा कुलूपबंद आहेत. सुरुवातीचे काही दिवस मुकाटपणे घरात बसलेल्यांना लॉकडाऊन काही मानवेना. परवा एका व्यापारी पेढीबद्दल पोलिसांना कोणीतरी फोन केला. पोलीस गेले. तपासणी केल्यावर दुकानाला मागच्या बाजूने खास दरवाजा बसवल्याचे दिसले. दुकानाची मागची भिंत चक्क फोडूनच टाकली होती. लाकडी दरवाजा आणि त्यावर जाळीचे शटर बसवले होते. समोरुन बंद असणाऱ्या दुकानात मागील दाराने मात्र मोठी उलाढाल सुरु असायची. समोरच्या दरवाजात नोकर थांबायचा, ग्राहकांना मागच्या दाराकडे पाठवायचा. शेजाऱ्याला ते पाहवले नाही आणि त्याने पोलिसांना टीप दिली.
साहेब, आंदोलन फकस्त नावातच हाय!
परवा एका संघटनेचे तरुण पोलीस ठाण्यात गेले. निवेदन देण्यासाठी त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार होते आणि त्यासाठी पोलिसांची परवानगी हवी होती. पोलीस ठाण्याच्या साहेबांनी निवेदनाची प्रत मागितली. मजकूर वाचणे दूरच, पण त्यावरचे संघटनेचे नाव पाहूनच साहेबांनी केबीनबाहेर हाकलायला सुरुवात केली. ‘अमुक-अमुक आंदोलन संघटना’, असे नाव पाहून साहेबांनी परवानगी साफ नाकारली. त्यांच्या नाकदुऱ्या काढेपर्यंत तरुणांची पुरेवाट झाली. म्हणाले, ‘साहेब, फक्त नावातच आंदोलन हाय, आमच्या संघटनेने आजवर कोठेच आंदोलन केलेले नाही.’ साहेबांची कशीबशी समजूत निघाल्यावरच हिरवा कंदील मिळाला.