सांगली : रविवारी दिवसभरात फक्त १,१२२ जणांना कोरोना लस मिळाली. लसीचा साठा संपल्याने सुमारे २५० केंद्रांत लसीकरण होऊ शकले नाही. सोमवारी (दि.१७) देखील अशीच स्थिती राहणार आहे.
लस उपलब्ध असल्यासंदर्भातील कोणताही निरोप जिल्हा प्रशासनाला मिळालेला नव्हता. त्यामुळे सोमवारी लसीकरण बंद राहणार आहे. रविवारी फक्त २० केंद्रांवर लसीकरण सुरू राहिले. तेथे २० लाभार्थ्यांना पहिला डोस व ११०२ जणांना दुसरा डोस मिळाला. ४५ ते ६० वर्षांच्या २९२ लाभार्थ्यांना व ६० वर्षांवरील ७८२ लाभार्थ्यांना लस मिळाली. १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरण बंदच आहे. महापालिका क्षेत्रात ३२२ जणांचे लसीकरण झाले. ग्रामीण भागात ७७१ जणांचे तर निमशहरी भागात फक्त २९ जणांचे लसीकरण झाले. इस्लामपूर, विटा, खानापूर, पलूस, कडेगाव, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ आदी तालुक्यांच्या शहरांत लसीकरण केंद्रे बंदच राहिली.
पहिला डोस घेतलेल्या अनेक नागरिकांना दोन महिने झाले तरी दुसरा डोस मिळेना झाला आहे. त्यामुळे ते हैराण झाले आहेत. खासगी रुग्णालयांतही लस उपलब्ध नाही. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत लाभार्थ्यांची नावे नोंदवून घेण्यात येत आहेत. पण तेथेही लस उपलब्ध नाही. ४५ वर्षांवरील नागरिकांनी आता दुसरा डोस ८४ दिवसांनी घ्यावा, अशी सूचना आरोग्य विभागाकडून केली जात आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
चौकट
जिल्हा परिषदेकडे अवघे ६०० ते ७०० डोस शिल्लक आहेत. त्यातून सोमवारी ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस दिला जाईल. पुण्याहून लस उपलब्धतेविषयी निरोप येण्याची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.