अशोक डोंबाळे -- सांगली --जिल्ह्यातील १०४ गावे आणि ८२० वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख ६० हजार ८०६ लोकसंख्येला १२२ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. तलाव, विहिरी, विंधन विहिरींचा आधार घेऊन टँकर भरले जात आहेत. परंतु, जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठी शिल्लक असल्याची पाटबंधारे विभागाची माहिती आहे. तीसहून अधिक तलाव कोरडे पडले असून, तहानलेल्या गावांसाठी प्रशासनाकडून पाणी उद्भवाचा शोधाशोध सुरु आहे. टेंभू, आरफळ, ताकारी अािण म्हैसाळ योजनांमधून काहीप्रमाणात पाणी सोडल्यामुळे दुष्काळी तालुक्यातील टंचाईची झळ काहीप्रमाणात कमी झाली आहे.जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाझर तलाव फेब्रुवारी महिन्यातच कोरडे पडण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात ८३ पाझर तलाव असून, यामध्ये नऊ हजार ४३८.८६ दशलक्ष घनफूट साठ्याची क्षमता आहे. यापैकी सध्या तीसहून अधिक तलाव कोरडे पडले आहेत. उर्वरित तलावांमध्ये एक हजार २६८.५४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. १३ टक्केच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. एवढ्या पाण्यावर लाखो लोकसंख्येचा आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि आरफळ उपसा सिंचन योजनेतून कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, मिरज पूर्व भागातील तलावांमध्ये पाणी सोडल्यामुळे १३ टक्के पाणीसाठा दिसत आहे. जत तालुक्यातील मोजक्याच भागात म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचत असल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. तहानलेल्या गावांसाठी प्रशासनाकडून उद्भवांचा शोधाशोध सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. जत तालुक्यातील ५९ गावे आणि ५३३ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ७५ हजार ८५७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून, भविष्यात टँकर वाढण्याचीच शक्यता आहे. जत तालुक्यानंतर तासगाव तालुक्यात सर्वाधिक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. बावीस गावे १७० वाड्या-वस्त्यांमधील तीस हजार ८०४ लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवठा होत आहे. खानापूर तालुक्यातील दहा गावे आणि ४१ वाड्या-वस्त्यांमधील जनतेची तहान बारा टँकरद्वारे भागविली जात आहे. उन्हाळी पाऊस झाला नाही तर भविष्यात दुष्काळी तालुक्यांतील परिस्थिती आणखी कठीण होणार आहे. टेंभू योजनेमुळे आटपाडी तालुक्यात प्रथमच दुष्काळाची झळ कमी झाली आहे. आटपाडी तालुक्यातील केवळ चार गावे आणि १६ वाड्या-वस्त्यांवर तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात सहा गावे, ५७ वाड्या-वस्त्यांवर नऊ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. कडेगाव तालुक्यातील ढानेवाडी या एकमेव गावाला टँकर सुरु आहे. कृष्णा आणि वारणा नदी वाळवा आणि शिराळा तालुक्यातून वाहत असतानाही शिराळा तालुक्यात एक गाव आणि दोन वाड्यांना, तर वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर गावाला टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. चाऱ्याचा प्रश्न : पाण्याची चिंता वाढली...पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व भागातील खरीप व रबी हंगामातील पिके वाया गेली आहेत. यामुळे येथील पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांचा पशुधन जगविण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरु आहे. चाऱ्यापेक्षाही शेळ्या-मेंढ्या आणि अन्य मोठ्या पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. दुष्काळी भागामध्ये पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न शासनाने तातडीने सोडविण्याची मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.एप्रिल ते जून महिन्याचा ३३ कोटींचा टंचाई आराखडा तयारएप्रिल ते जून २०१६ या तीन महिन्यांचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ३३४ गावे आणि एक हजार २०३ वाड्या-वस्त्यांना टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये टंचाई उपाययोजना करण्यासाठी नवीन विंधन विहीर घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, २८० नव्याने टँकर सुरु करावे लागणार असून, त्यासाठी ३३ कोटी ६४ लाख ८६ हजारांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक
By admin | Published: April 05, 2016 11:36 PM