कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या २,९८२ संभाव्य लाभार्थ्यांपैकी २,८०१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजे ९४ टक्के लसीकरण झाले असून, उर्वरित १८१ पैकी १८ ते २० जण कोरोना बाधित असल्याने त्यानी अद्याप पहिला डोस घेतला नाही. बाकी १६२ जणांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी केले आहे.
कामेरी येथे २,८०१ पहिला डोस घेतलेल्यांपैकी फक्त ७८३ नागरिकांनी म्हणजे फक्त २८ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला असून, शासनाने पहिल्या व दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढविल्यामुळे सध्या कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असून ती घेण्यासाठी लाभार्थी नाहीत, अशी अवस्था झाली आहे.