लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रतापसिंह उद्यानाच्या सुशोभिकरणाचे काम नियमानुसारच झाले आहे. काही सदस्यांकडून पैशासाठी कामाबाबत सभेत आरोप करण्यात आल्याची टीका उद्यानाचे ठेकेदार रवींद्र केंपवाडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. संबंधित सदस्यावर मानहानीचा दावा करणार असून, वेळप्रसंगी त्यांची नावेही उघड करू, असा इशाराही त्यांनी दिला.
सोमवारी झालेल्या सभेत प्रतापसिंह उद्यानाचे ठेकेदार केंपवाडे यांना काळ्या यादीत टाका, असा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, महापालिकेने प्रतापसिंह उद्यानाच्या सुशोभिकरणाचे १ कोटीचे काम २०१४ ला दिले. पहिल्या टप्प्यातील स्वच्छतागृह, खेळणी, लॉन, कंपाऊंड भिंत अशी कामे पूर्ण केली आहेत. ५५ लाखांचे काम झालेले असताना प्रशासनाने ४० लाखांचे बिल अदा केले आहे. दुसºया टप्प्यात अॅम्पी थिएटरसह अनेक कामे आहेत. या कामाच्या मूळ आराखड्यात बदल झाला आहे. या बदलाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली नाही. गेली दीड वर्षे मंजुरीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आहे. प्रशासकीय मंजुरीशिवाय उर्वरित काम कसे पूर्ण करणार? असा सवालही केला. मंजुरी मिळताच ६० दिवसांत काम पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.
इस्लामपूर रस्त्यावर पामची झाडे लावण्याचे काम २०१२ लाच पूर्ण केले आहे. वर्षभर देखभाल करून ती महापालिकेकडे हस्तांतरित केली होती. पण त्यानंतर प्रशासनाने त्याची देखभाल केली नाही. सुरक्षारक्षकांच्या ठेक्यात एक रुपयाचाही अपहार नाही. तरीही आरोप केले जात आहेत. हे निव्वळ टक्केवारीसाठी सुरू आहे. महासभेने परवानगी दिल्यास नगरसेवकांच्या शंकांचे निरसन करण्यास तयार आहे.