अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपुरात दारूबंदीसाठी विकास आघाडीतील नगरसेविका सुप्रिया पाटील आक्रमक झाल्या आहेत. विरोधी राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. परंतु बंदीसाठी ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यातच दारूबंदी होऊ नये यासाठी हॉटेल असोसिएशनने नगरपालिकेकडे धाव घेतली आहे. त्यातून शहरातील दारूबंदीबाबत पालिकेच्या सभागृहात केवळ बनवाबनवी सुरू असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी शहरात दारूबंदी करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन माहिती पत्रकांचेही वितरण केले आहे. सध्या इस्लामपूर शहरात ३ बिअर शॉपी, २ वाईन शॉप, १७ परमीट रुम बिअरबार व १० देशी दारू विक्रीची दुकाने आहेत. सुप्रिया पाटील यांचे दारूबंदीचे काम प्रामाणिकपणे सुरू असले तरी, त्यांना पालिकेच्या सभागृहात कसलाही प्रतिसाद मिळत नाही. सत्ताधारी आणि विरोधक केवळ सभागृहात या विषयावर चर्चा करतात, ठोस भूमिका मात्र घेत नाहीत. दारूबंदीचा ठराव करण्यासाठी त्यांच्याकडून चालढकल सुरू आहे.
शहरात दारूच्या दुकानांची रेलचेल असताना, मध्यवर्ती ठिकाणच्या सावकार कॉलनीतील हॉटेलला पालिका प्रशासनाने परमीट रुमसाठी नाहरकत दाखला दिला आहे. त्यासाठी सत्ताधारी विकास आघाडीतीलच काही नगरसेवक आघाडीवर होते. परंतु या परमीट रुमला परवानगी मिळू नये यासाठी विकास आघाडीतील नगरसेवक अमित ओसवाल यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार अर्ज केला आहे. त्यामुळे सध्या येथील परमीट रुमचे काम बंद ठेवण्यात आले आहे.
दारूबंदीबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये एकमतच होत नाही. सत्ताधाऱ्यांमध्येही मतप्रवाह आहेत. त्यामुळे दारूबंदी होणार का, हा यक्षप्रश्न बनला आहे.तथाकथित पत्रकार एजंटाची मध्यस्थीअमित ओसवाल प्रभाग क्र. १२ मध्ये नगरसेवक आहेत. याच प्रभागात सावकार कॉलनी येते. याच कॉलनीतील हॉटेलला परमीट रुमसाठी नाहरकत दाखला मिळवून देण्यासाठी एजंट असलेल्या तथाकथित पत्रकाराने व विकास आघाडीतील नगरसेवकाने पालिकेत मध्यस्थी केली होती. परंतु हा पत्रकार आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवून याला स्थगिती मिळविल्याचे नगरसेवक अमित ओसवाल यांनी स्पष्ट केले.
इस्लामपूर शहरात दारूबंदी करण्यासाठी विकास आघाडीचा पुढाकार आहे. भाजपच्या नगरसेविका सुप्रिया पाटील त्यात अग्रभागी आहेत. पालिका सभागृहात दारूबंदीचा ठराव करण्याबाबत आमचाच पुढाकार राहील.- विक्रम पाटील, पक्षप्रतोद, विकास आघाडी.तत्कालीन आरोग्य सभापती संग्राम पाटील यांनी आयत्यावेळी आलेल्या दारूबंदी विषयावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु हा विषय नेहमीप्रमाणे तहकूब झाल्याने यावर सभागृहात चर्चा झालीच नाही. येणाºया सभेत ठामपणे दारुबंदीवर चर्चा करू.- संजय कोरे, गटनेते, राष्ट्रवादी.