सकाळच्या सत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला सौदे सुरू होते. दुसऱ्या छायाचित्रात इस्लामपूर बस आगारात फलाटावर बसेस होत्या, पण प्रवासी नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरामध्ये संचारबंदी सुरू झाल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. इस्लामपूर बसस्थानकातून सांगली, मिरज, कोल्हापूरसह लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात आल्या, परंतु त्यांना प्रवासीच नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातील काही बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. सकाळच्या सत्रात फिरायला जाणाऱ्यांची संख्या तुरळक आहे. कृषी बाजार समितीच्या आवारात फळे, भाजी लिलाव आणि विक्रीचे व्यवहार सुरू होते. या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते. बरेच भाजी विक्रेते विनामास्क वावरत होते. काहींच्या मुखात मावा, गुटखा होता. ते त्याच ठिकाणी थुंकत होते. यावर कोणाचेच नियंत्रण नाही. फळे, चहा, नाष्टा, बेकरी, किराणा दुकाने आदी सुरू होते. त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत.
सकाळपासून इस्लामपूर आगारातून विठ्ठलवाडी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या बसेस सोडण्यात आल्या, परंतु प्रवासी नसल्याने काही बसेस रद्द करण्यात आल्या. ग्रामीण भागात जाणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. कोल्हापूर, सांगली याठिकाणी बसेस सोडण्यात आल्या, परंतु दोन-दोन तास प्रवासीच नव्हते. कमीत कमी वीस प्रवासी जमल्यानंतरच बस सोडण्यात येत होती. बरेच चालक आणि वाहक सेवेवर हजर झाले होते, परंतु प्रवाशांअभावी फेऱ्या रद्द केल्याने त्यांना घरी जावे लागले. बसस्थानकासह प्रवासी रिक्षाही सुरू होत्या. पण त्यांनाही प्रवासी मिळत नव्हते.