सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील यांचे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय नव्हे, तर वैचारिक मतभेद होते. दोघांनी मिळूनच ते वाद संपुष्टात आणले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या वतीने सांगलीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण मंगळवारी आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड उपस्थित होते.पवार म्हणाले, “एमआयडीसीच्या माध्यमातून राज्यभर जो उद्योग विस्तार झाला, त्यात तत्कालीन उद्योगमंत्री म्हणून राजारामबापूंचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र काँग्रेसची धुरा सांभाळत ते राज्याच्या काेनाकोपऱ्यांत पोहोचले. ग्रामविकास, महसूल व उद्योग अशा खात्यांचे मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी घेतलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले. लोकांच्या प्रश्नांसाठी मेहनत घेताना ते थकले नाहीत. जळगाव ते नागपूरदरम्यान जी पहिली शेतकरी दिंडी निघाली, त्यात आम्ही सगळे थकून थांबलो; पण, अविश्रांत यात्रा पूर्ण करणारे केवळ राजारामबापू व प्रा. एन. डी. पाटीलच होते.”
बापू - दादांमधील फरकशरद पवार म्हणाले, “वसंतदादा व राजारामबापूंच्या कार्यपद्धतीत एक फरक दिसून येतो. वसंतदादा बहुतांश काळ सत्तेत होते. सत्तेत राहून त्यांनी विकासात योगदान दिले. मात्र, राजारामबापू यांनी विरोधात असतानाही विकासकामे केली.”
सांगली जिल्हा चमत्कारिक“सांगली जिल्हा मला नेहमी चमत्कारिक वाटतो. येथील लोक कधी काय करतील, याचा नेम नाही. देशातील पहिली सर्कस याच जिल्ह्यातील व्यक्तीने काढली. खानापूर, कडेगाव, आटपाडी, जतमधील लोक तर देशाच्या काेनाकोपऱ्यात दिसतात. लाचारी न पत्करता स्वाभिमानाने जगणारे लोक इथे मला दिसतात,” असे कौतुक पवार यांनी केले.