जयवंत आदाटे ।जत : जत तालुक्यात आजअखेर २७ चारा छावण्या मंजूर असून, त्यापैकी २५ चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे १३ हजार २२० लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत. परंतु सुमारे तीन हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे योग्य उपचाराअभावी छावणीतील जनावरांची हेळसांड होताना दिसत आहे.
तालुक्यात खिलार व इतर जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यामध्ये श्रेणी एकचे १४ व श्रेणी दोनचे ९ असे एकूण २३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. श्रेणी दोनचे दवाखाने कोंत्येवबोबलाद, अंकले, वळसंग, तिकोंडी, डफळापूर, बिरूळ, मुचंडी, शेगाव, वाळेखिंडी या नऊ गावांत आहेत, तर श्रेणी एकचे दवाखाने जत, उमदी, सोन्याळ, येळवी, बोर्गी, संख, कुंभारी दरीबडची, सनमडी, उमराणी, वज्रवाड, माडग्याळ या चौदा गावांत आहेत.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी पाचजण कार्यरत आहेत. त्यातील दोनजण प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी काम करत असून, नऊ पदे रिक्त आहेत. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांची तीन पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोनजण कार्यरत आहेत. त्यापैकी एकजण प्रतिनियुक्तीवर काम करत असून, एक पद रिक्त आहे. जत तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी व सहायक पशुवैद्यकीय अधिकारी अशी एकत्रित मिळून दहा पदे रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या सातपैकी तीनजण प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी काम करत आहेत. प्रत्यक्षात चारच पशुवैद्यकीय अधिकारी जत तालुक्यात काम करत असून, त्यांच्याकडून सुमारे १३ हजार २२० जनावरांची देखभाल, लसीकरण, टॅगिंग केले जात आहे.
जत तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सुमारे साडेतेरा हजारहून अधिक जनावरे चारा छावणीतील दावणीला बांधण्यात आली आहेत. छावणीतील जनावरांना उष्मादाह, गोचीड, ताप, जुलाब असे आजार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी जत तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी व दुंडाप्पा बिराजदार यांनी केली आहे.