शिराळा/वारणावती : सततच्या पाण्याच्या विसर्गामुळे चांदोली (वारणा) धरणात केवळ पाऊण टीएमसी (०.७५) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मृतसंचय साठा ६.८८ टीएमसी आहे, तरीही धरणातून सध्या १४०० क्युसेक विसर्ग सुरूच आहे. कमी पाणीसाठ्यामुळे वीस दिवसांपासून वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे.चांदोली (ता. शिराळा) येथील धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या या परिसरातील हे धरण प्रत्येकवर्षी पूर्ण क्षमतेने भरते. पण गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने ते ९० टक्के भरले होते. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्यासाठी, तसेच सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ व वाकुर्डे योजनेसाठी या धरणातून नियमित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणातील ६.८८ टीएमसी मृतसंचय पाणीसाठा सोडून केवळ ०.७५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. दुष्काळी भागाला जलसंजीवनी देणाऱ्या या धरणातील पाणी पातळी वेगाने कमी झाली आहे.या धरणामध्ये मागीलवर्षी या कालावधित १२.३३ टीएमसी पाणी पातळी होती. यंदा ती अधिक खालावली आहे. यामुळे वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. सध्या धरणातून सिंचनासाठी केवळ १४०० क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाणी विसर्ग चालू आहे. (वार्ताहर)३२ पाझर तलाव कोरडेचांदोली धरणातील पाणी योजनेतून शिराळा तालुक्यातील मोरणा धरणाच्या कार्यक्षेत्रात पाणी मिळाले आहे. असे असले तरी, सध्या तालुक्यातील ३२ पाझर तलाव कोरडे आहेत, तर मोरणा धरणात वाकुर्डे योजनेचे पाणी आले आहे. शिवणी, रेठरेधरण ही धरणे पूर्ण कोरडी पडली आहेत. चार गावांमध्ये सध्या टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चांदोली धरणापासून २५० फुटांवर असणाऱ्या कालव्याला महिन्याभरापूर्वी पडलेले भगदाड मुजवून तेथे भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.२२ मीटर लांबीच्या आरसीसी भिंतीचे काम पूर्णत्वास येत आहे. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हे भगदाड पडले होते. नवीन भिंतीमुळे पाण्याचा वेग नियंत्रित होण्यास मदत होईल. हे काम येत्या दोन दिवसात पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चांदोलीत केवळ पाऊण टीएमसी पाणीसाठा
By admin | Published: May 31, 2016 11:45 PM