सांगली : केंद्रातील मोदी सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. पण ती फोल ठरली आहे. मोदींनी फसविल्याचा भावना युवकांत असून तेच सरकारला घरी बसवतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगलीत केले.
सांगलीत युथ जोडो, बुथ जोडो अभियानातर्गंत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षात २० कोटी नोकऱ्या अपेक्षित होत्या. पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले. नोटबंदीचा मोठा फटका युवकांना बसला. केंद्रातील सरकारने फसविल्याने युवकात असंतोष आहे. देशाला अकार्यक्षम पंतप्रधान दिल्याची जाणिवही त्यांना झाली आहे.
देशात पावणे दहा लाख तर महाराष्ट्रात तीन लाख पदे रिक्त आहेत. नोकरभरती बंद आहे. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जात आहे. उद्योगासाठी पायाभूत सुविधा नाहीत. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. पंतप्रधान मोदी केवळ स्वत:चे ब्रँडींग करण्यात मग्न आहेत. आता हेच तरुण मोदींना घरी बसवतील.
युवकचे जिल्हाध्यक्ष मनोज सरगर म्हणाले की, कोरोना काळात युवक काँग्रेसचे कार्यकर्तेच रस्त्यावर उतरून जनतेला मदत करीत होते. ऑक्सीजन पुरविण्यापासून रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत सारी यंत्रणा काँग्रेसची कार्यरत होती. भाजपचे कार्यकर्ते कुठेच दिसत नव्हते.यावेळी प्रदेश प्रभारी उदय भानू, सह प्रदेश प्रभारी एहसान खान, शिवराज मोरे, हर्षद कांबळे, सुधीर जाधव उपस्थित होते.