इस्लामपूर : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस कमिटीच्या नावे असलेल्या इमारतीचा ताबा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाकडे ठेवला आहे. ही जागा व इमारत काँग्रेस पक्षाला परत केली, तरच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रचार करतील, असा इशारा देण्यात आला.इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहात पक्षनिरीक्षक व आंध्रप्रदेशचे माजी मंत्री डॉ. साके शैलजाथ व सहनिरीक्षक शशांक बावचकर यांनी वाळवा तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्वबळावर लढण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.या बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कमिटीच्या जागा व इमारतीचा प्रश्न उपस्थित करत आ. जयंत पाटील यांनी ही मागणी मान्य करून जागा व इमारत काँग्रेस पक्षाकडे सुपूर्द करावी. तरच आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारात भाग घेऊ, अशी भूमिका जाहीर केली.यावेळी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. मनिषा रोटे, प्रदेश सदस्य ॲड. आर.आर. पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, युवकचे प्रदेश सरचिटणीस विजय पवार, जयदीप पाटील उपस्थित होते.
Sangli: ..तरच जयंत पाटील यांचा प्रचार, इस्लामपूरच्या बैठकीत काँग्रेसने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 4:31 PM