लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नगरपालिकेची महापालिका झाली, शहराचा विस्तार वाढला, लोकसंख्या वाढली, पण भाजी मंडई उभारणीची इच्छाशक्ती कोणीच दाखविली नाही. गेल्या साठ वर्षांत सांगलीत हरिपूर रोडवर एक भाजी मंडई उभारण्यात आली. पण आजअखेर त्या मंडईत कधी भाजीपाला बाजारच भरला नाही. त्यामुळे भाजी, फळ विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून असतात. कुपवाडमध्ये तर एकही भाजी मंडई नाही. त्यात मंडईसाठी आरक्षित जागांचाही महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने संगनमताने बाजार केला आहे.
पेठभाग परिसरात संस्थान काळात बांधीव व सुविधांनीयुक्त भाजी मंडई अस्तित्वात आली. तत्पूर्वी याच मंडईसमोर फळविक्रेते व अन्य किरकोळ व्यापाऱ्यांसाठी गाळे बांधण्यात आले होते. संस्थानच्या विलिनीकरणावेळी ही मंडई सांगली नगरपालिकेकडे वर्ग झाली. त्यानंतर १९५८ मध्ये शिवाजी मंडईची उभारणी झाली. सुरुवातीला या मंडईत इतक्या असुविधा होत्या की भाजी विक्रीचा व्यवसाय करणेही जिकिरीचे होते. शिवाजी मंडईनंतर तब्बल ५० वर्षांनी म्हणजे २००७-०८ मध्ये हरिपूर रस्त्यावरील राजमती कॉलनीत महापालिकेने मागासवर्गीय समितीच्या निधीतून नवीन भाजी मंडई बांधली. पण या मंडईत आजअखेर कधी बाजारच भरलेला नाही.
नाल्याशेजारी असलेल्या या मंडईवर अवकळा आली आहे. तिथे ना भाजी विक्रेते जातात, ना ग्राहक. आता तर ही मंडई नागरिकांच्या विस्मृतीत गेली आहे. त्यानंतर आजअखेर नवीन मंडई उभारण्याची सुबुद्धी ना सत्ताधाऱ्यांना सूचली ना प्रशासनाला. अनेकदा ठिकठिकाणी घोषणा झाल्या, पण मंडईची साधी वीटही बसलेली नाही.
चौकट
सांगलीत २५ ठिकाणी बाजार
आज रस्त्यावर भाजी, फळ विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. जवळपास पाच ते सात हजारहून अधिक विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करतात. त्यातच शहरात आठवडा बाजारचे पेव फुटले आहे. एकट्या सांगलीत २५ ठिकाणी आठवडा बाजार भरतो. म्हणजे एक दिवसाला तीन ते चार ठिकाणी बाजार असतो. तोही रस्त्यावरच! परिणामी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.
चौकट
आरक्षित जागांचा बाजार
महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात सांगलीत ७ व कुपवाडमध्ये ४ अशा ११ जागांवर भाजी मंडईचे आरक्षण आहे. सांगलीत अहिल्यादेवी होळकर चौक, तक्षीला स्कूल, दत्तनगर, विश्रामबाग, सांगलीवाडी, आरवाडे पार्क, पंचशीलनगर व कर्नाळ रोड, तर कुपवाडमध्ये सूतगिरणीसह सर्व्हे नंबर २३, १९८ व १८५ या जागेवर मंडईचे आरक्षण आहे. पण यापैकी एकाही जागेवर भाजीमंडई उभारलेली नाही. आता या जागांवरील आरक्षण उठवून त्याचा बाजार करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.