-----------
मिरज : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे आगमन झाल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन दोन दिवसात बंद करण्यात येणार आहे. ५ मार्चपासून म्हैसाळचे आवर्तन सुरू असून पाणी जतच्या पुढे मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचले आहे.
मिरज पूर्व भागासह जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारीअखेर उन्हाची तीव्रता वाढून पाणीटंचाई निर्माण झाल्याने ५ मार्चपासून आवर्तन सुरू झाले. म्हैसाळचे आवर्तन सुरू असल्याने दुष्काळी भागात ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध होऊन शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली. सहा टप्प्यात सुमारे ६५ पंपांद्धारे जतच्या पुढे मंगळवेढा तालुक्यापर्यंत पाणी पोहोचले. मंगळवेढा तालुल्यात चिखलगी, शेवनांदगी, बावची, जंगलगी पाऊट परिसरात म्हेैसाळ योजनेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे आगमन झाले असून पाण्याला मागणी नसल्याने दोन दिवसात आवर्तन बंद करण्यात येणार असल्याचे म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाैकट
टंचाईग्रस्त गावांना दिलासा
दरवर्षी पावसाळ्यानंतर नोव्हेंबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी चांगल्या पावसामुळे सिंचनासाठी पाण्याला मागणी नसताना तीन तालुक्यात ९१ टंचाईग्रस्त गावात १५९ तलावात पाणी सोडण्यात आले होते. यामुळे या टंचाईग्रस्त गावात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले.