सांगली : अत्यावश्यक सेवेत नसलेल्या व्यापाऱ्यांना व्यावसायास परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही अत्यावश्यक सेवेतील व्यावसाय बंद करू, असा इशारा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
अत्यावश्यक सेवेत नसलेल्या व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असताना त्याला चेंबर ऑफ काॅमर्सने गुरुवारी पाठिंबा दर्शविला. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, माजी महापौर सुरेश पाटील, अरुण दांडेकर, गोपाळ मर्दा, भरत गिडवाणी आदी उपस्थित होते. शरद शहा म्हणाले की, शहरातील सर्व व्यापारी आमचेच बांधव आहेत. संकटात त्यांची साथ आम्ही सोडू शकत नाही. गेल्या शंभर दिवसांपासून व्यापार बंद असल्याने व्यापारी अभूतपूर्व संकटात सापडले आहेत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.
सुरेश पाटील म्हणाले की, अत्यावश्यक सेवेतील व्यापार आम्ही आठवड्यातून तीन दिवस बंद ठेवण्यास तयार आहोत, त्याऐवजी त्या तीन दिवसांत अत्यावश्यक सेवेत नसलेल्या व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात यावी. सध्या महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेट ७.५ आहे. वाळवा, पलूस व कडेगाव वगळता अन्य तालुक्यातील चाचण्यांची संख्या वाढवून अलगीकरण केंद्रे वाढविल्यास पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊ शकतो. केवळ लॉकडाऊनने रुग्णसंख्या आटोक्यात येणे कठीण आहे. त्यामुळे प्रशासनाने अन्य पर्याय आता शोधावेत.
अरुण दांडेकर म्हणाले की, व्यापारी सर्व बाजूंनी अडचणीत आले आहेत. व्यापाऱ्यांनी नेहमीच प्रशासनाला सहकार्य केले आहे. नियमांचे पालनही व्यापारी प्रामाणिकपणे करत आहेत. दुकाने बंद असतानाही कामगारांना पगार देण्याचे काम व्यापारी करीत आहेत. तरीही व्यापाऱ्यांवर लॉकडाऊन का लादला जात आहे?
भरत गिडवाणी म्हणाले की, मुंबईसारख्या महानगरातील रुग्णसंख्या सांगलीपेक्षा कमी असेल तर कुठे तरी नियोजन चुकत आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांना वेठीस न धरता अन्य उपाययोजना कराव्यात.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव
तीन दिवस अत्यावश्यक सेवांना परवानगी देऊन तीन दिवस अन्य व्यापाराला परवानगी द्यावी, ज्याठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, अशा ठिकाणच्या बाजारपेठा सुरू कराव्यात, नियमांचे बंधन घालून सर्व व्यापार सुरू करावा, असे प्रस्ताव गुरुवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले आहेत.