आदित्य घोरपडे : हरिपूर , दर्जेदार खेळाडू घडवण्याची फॅक्टरी म्हणूनच क्रीडा प्रबोधिनीकडे पाहिले जाते. पंधरा वर्षांपूर्वी राज्य सरकारने लावलेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पात्रता आहे, जिगर आहे; पण बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मैदानापासून दुरावणाऱ्या गोरगरीब गुणवंत खेळाडूंना सुवर्णसंधी चालून आली आहे. सांगलीत नवीन खेळाडूंना प्रवेश देण्यासाठी २५ जुलैला नैपुण्य चाचणी (बॅटरी आॅफ टेस्ट) घेण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी राज्य सरकार कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र अजूनही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त खेळाडू प्रबोधिनीचा लाभ घेत नाहीत. बऱ्याचजणांना तर क्रीडा प्रबोधिनीची योजना काय आहे, हेच माहीत नाही. राज्यात सध्या ११ क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. आजवर यातून शेकडो मातब्बर खेळाडू बाहेर पडले आहेत. एकदा क्रीडा प्रबोधिनीत खेळाडूची निवड झाली की त्याचा संपूर्ण खर्च सरकार करत असते. क्रीडा प्रबोधिनीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आठ ते चौदा वर्षे वयोगटाच्या म्हणजेच इयत्ता आठवीपर्यंच्या खेळाडूस प्रबोधिनीत प्रवेश मिळतो. प्रवेशासाठी खेळाडूस २७ गुणांची नैपुण्य चाचणी द्यावी लागते. यापैकी १७ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूची पुढील चाचणीसाठी निवड होते. ८०० मीटर धावणे, उभे राहून लांबउडी, उभे राहून उंचउडी, मेडिसीन बॉल थ्रो, ३० मीटर भरधाव धावणे, ६ ७ १० मीटर शटर रन, लवचिकता, वजन, उंची अशा प्रत्येकी तीन गुणांच्या एकूण नऊ चाचण्या होतात. इच्छुक खेळाडूंना तालुका, जिल्हा, विभाग हे तीन टप्पे पार केल्यानंतर राज्य चाचणीत सहभागी होता येते. राज्य चाचणीत यशस्वी ठरणाऱ्या खेळाडूंची अंतिम निवड होते. खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या खेळाडूंना ही योजना वरदानच आहे.
क्रीडा प्रबोधिनीचे दरवाजे खुले
By admin | Published: July 10, 2014 12:37 AM