लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून सांगलीतील व्यापार ठप्प आहे. शहरातील व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करीत व्यापार खुला करावा, असे साकडे व्यापारी संघटनांच्या वतीने पालकमंत्री जयंत पाटील यांना घालण्यात आले.
महापालिका क्षेत्रातील व्यापार, उद्योग सुरू करण्याबाबत व्यापारी संघटनांची भूमिका जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक शेखर माने यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्स, सराफ असोसिएशन, कापड पेठ असोसिएशन, रेडिमेड गारमेंट असोसिएशन, मेन रोड असोसिएशन, गणपती पेठ असोसिएशन, मोबाइल शॉपी, ऑटोमोबाइल, पानपट्टी, भांडी व्यापारी, सायकल विक्री, गणेश मार्केट, किराणा भुसार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी ऑनलाइन संपर्क साधला. तीन महिन्यांपासून बाजारपेठ ठप्प असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने नियमांमध्ये दुरुस्ती करून बाजारपेठ सुरू करावी. व्यापारी संघटनांच्या वतीने बाजारपेठेत नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले जाईल, अशी हमीही देण्यात आली, तसेच रस्त्यावरची गर्दी टाळण्याकरिता बाजारपेठेमध्ये नो ऑफर्स झोन राबविण्याची मागणी करण्यात आली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिवांशी चर्चा करून व्यापार सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.