सांगली : शहरातील रतनशीनगरच्या बाजूस असलेल्या अंबाईनगर येथील दहा कोटीचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तक्रार सोमवारी नागरिकांनी महापालिकेकडे केली. या भूखंडावर एका सार्वजनिक मंडळाने अतिक्रमण करून फलक लावले आहेत. या तक्रारीची दखल घेत महापालिकेने या मंडळाला नोटीस बजावून फलक काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. अंबाईनगर येथील सर्व्हे क्रमांक ११६ मध्ये मंजूर रेखांकनात २८ हजार स्क्वेअर फुटाचा खुला भूखंड आहे. या भूखंडावर महापालिकेची मालकी आहे. या परिसरातील सांगली कॉलेज कॉर्नर क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने या जागेवर दोन फलक लावले आहेत. याची कुणकुण लागताच अंबाईनगरमधील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली. महापालिकेचा हा खुला भूखंड मंडळास हस्तांतरण झालेला नसताना, त्यावर बेकायदेशीररित्या फलक लावून तो हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भूखंडामध्ये मंडळाकडून दिवस-रात्र पहारा ठेवून भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांत दहशत निर्माण झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापकांनी मंडळाला नोटीस बजाविली आहे. खुल्या जागेवर अनधिकृतपणे दोन फलक लावले असून त्यात देव-देवतांची छायाचित्रे लावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. त्यामुळे दोन्ही फलक तात्काळ काढून घ्यावेत, तसेच कायदेशीर बाबी पूर्ण होईपर्यंत या जागेवर बांधकाम करू नये, असे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)'ऐनवेळचा घोटाळाविकास आराखड्यातील आरक्षणे, खुल्या भूखंडाचा बाजार झाला होता. तेव्हा हा भूखंड संबंधित मंडळाला देण्यात आला होता. पण हे सर्व ठराव रद्द केले आहेत. तरीही भूखंडावर मंडळाने अतिक्रमण केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अंबाईनगरमधील कोट्यवधीचा खुला भूखंड हडपण्याचा डाव
By admin | Published: June 16, 2015 1:35 AM