सांगली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे सोमवारी रात्री जिल्हाभर आॅल आऊट आॅपरेशन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दोनशे जणांवर कारवाई करण्यात आली, तर साडेचारशे वाहनचालकांकडून पाऊण लाखाचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
आॅपरेशन आॅल आऊटमध्ये पोलीस दलाकडून ६८ अधिकारी, ५३३ कर्मचारी, १६२ होमगार्ड यांनी भाग घेतला. जिल्ह्यातील विविध चौक, कॉर्नर, ब्रीज, बायपास रस्ता, रेल्वेस्टेशन आदी परिसराची तपासणी करण्यात आली. एकूण ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी चोरीच्या उद्देशाने फिरणाºया एकास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना चकवून राहत असताना ४ आरोपी सापडले. f
सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती करणाºया ५२ जणांवर कारवाई केली. जुगाराचा खेळ खेळणाºया ११ जणांवर खटले दाखल केले. अटक वॉरंट असलेल्या ४५ जणांना ताब्यात घेण्यात आले. निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल्स, पानपट्टी, ढाबे अशा २१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. बेकायदेशीर दारू विक्री करणाºया ११ जणांवर कारवाई करण्यात आली. रेकॉर्डवरील ९६ गुन्हेगार तपासण्यात आले. मद्य प्राशन करून वाहन चालविणाºया ३८ जणांवर कारवाई करून खटले न्यायालयात पाठविण्यात आले.
तडीपार तिघा आरोपींवर कारवाई करण्यात आली. हजारावर वाहनांची तपासणी करून ४४३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुढील टप्प्यात ही मोहीम व्यापक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.