अशोक पाटील -- इस्लामपूर --माझी तब्येत आजही ठणठणीत आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडविण्याची ताकद माझ्यात आहे. मी जिवंत आहे, तोपर्यंत पालिकेवर झेंडा फडविण्यासाठी विरोधकांना एन्ट्रीच करू देणार नाही, असा इशारा पालिकेचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.विजय पाटील यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भक्कम असलेल्या राष्ट्रवादीला अधिक भक्कम करण्यासाठी एककलमी कार्यक्रम अवलंबला आहे. पाटील म्हणाले की, मी वयाच्या तेवीसाव्या वर्षापासून पालिकेच्या राजकारणात आहे. शहरातील गल्ली-बोळातील राजकारण आणि कार्यकर्त्यांची भक्कम साथ पाठीशी असल्याने गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पालिकेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे.सध्या पालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. प्रभाग रचनेकडे प्रत्येक कार्यकर्त्याचे लक्ष आहे. त्याअगोदरच सत्ताधारी आणि विरोधकांना नगरसेवक होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. पक्षप्रतोद पाटील यांचे निवासस्थान व राजारामबापू पाटील पुतळा परिसरात कार्यकर्त्यांची वर्दळ वाढू लागली आहे.सत्ताधाऱ्यांअगोदर विरोधकांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच झाली, तर नाराज कार्यकर्ते विरोधकांच्या हाताला लागतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीसाठी आठ-नऊ महिन्यांचा कालावधी आहे. तरीसुध्दा सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधकांत उमेदवारीवरून मंथन सुरू झाले आहे. निवडणुकीचे ‘बजेट’ही मांडले जात आहे. प्रभाग लहान झाल्याने खर्च कमी होणार असल्याने इच्छुकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करणाऱ्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. नाराजांची संख्या वाढून बंडखोरीचे पेव फुटण्याची शक्यता आहे.मागील निवडणुकीत पक्षप्रतोद पाटील यांची तब्येत बिघडल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यातूनही त्यांनी निवडणुकीची यंत्रणा सांभाळली होती. आता आगामी निवडणुकीत ते स्वत: निवडणुकीच्या रणांगणात असणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विरोधकांची डाळ शिजू देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.रुसवा-फुगवा कसा काढणार...सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरीची चर्चा असली, तरी इस्लामपूरच्या राजकारणात आ. जयंत पाटील एकमुखी नेतृत्व आहे. त्यांच्या आदेशानेच निवडणुकीची रूपरेषा आखली जाते. रुसवा-फुगवा काढण्यासाठी आमदार पाटील आणि पक्षप्रतोद पाटील काय उपययोजना करतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
विरोधकांना एन्ट्री नाही!
By admin | Published: April 13, 2016 9:38 PM