विटा : शिक्षण क्षेत्राच्या हितासाठी शिक्षक संघटनांनी चळवळीची तयारी ठेवावी. त्यासाठी सर्वांनी सक्रिय राहिले पाहिजे. संघटनांची कामे केवळ शैक्षणिक अधिवेशनापुरतीच चालू न ठेवता पदाधिकाऱ्यांनी कामात सातत्य ठेवले पाहिजे. शासनाची चुकीची शैक्षणिक धोरणे बदलायला लावण्यासाठी हळूहळू ठोका टाका, असा सल्ला माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ ही ‘पॉवरफुल्ल’ संघटना असून, विजयसिंह गायकवाड यांच्यारूपाने संघाला होतकरू राज्याध्यक्ष मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.येथे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे नूतन अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांच्या सत्कार समारंभात आ. डॉ. कदम बोलत होते. यावेळी आ. अनिल बाबर, माजी आ. सदाशिवराव पाटील, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र्र देशमुख, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने उपस्थित होते. प्रारंभी वाळूज-सांगोले येथील इंदिरा शिक्षण संस्थेच्यावतीने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन नूतन अध्यक्ष गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.आ. बाबर म्हणाले, खेडेगावातील व लहान विद्यालयातील मुख्याध्यापक गायकवाड राज्य महामंडळ संघाचे अध्यक्ष झाले. त्यासाठी त्यांना संघाने शक्ती दिली. गायकवाड यांनी विद्यार्थी व शिक्षणाच्या भवितव्याबाबत कधीही तडजोड केली नाही. नूतन अध्यक्ष गायकवाड यांनी मुख्याध्यापक संघटनेला गालबोट लागणार नाही, असे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्याध्यापक डी. पी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पंचायत समितीचे उपसभापती किसन सावंत, सुशांत देवकर, प्रा. कृष्णराव देवकर, जनार्दन बाबर, विठोबा पाटील, शिवाजी बाबर, कालिदास बाबर, भक्तराज ठिगळे, दत्तोपंत चोथे, मारुती बाबर उपस्थित होते. संभाजी पाटील यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)
चुकीच्या धोरणाविरोधी ठोका द्या
By admin | Published: October 13, 2016 2:34 AM