सांगली : महापालिकेच्या बेडग रस्त्यावर कत्तलखान्याची जागा हाडे व कातडी गोदामासाठी देण्यास नगरसेवक, वड्डी गावच्या नागरिकांनी विरोध करूनही हा ठराव बुधवारी महासभेत मंजूर करण्यात आला. यावेळी वहिदा नायकवडी यांनी टेबलाखालून हा विषय आणल्याचा आरोप केल्याने सभेत भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यामुळे सभेत काहीकाळ गोंधळ झाला.बेडग रस्त्यावरील महापालिकेच्या कत्तलखान्याची एक गुंठा जागा हाडे व कातडी ठेवण्यास केवळ साडेसहाशे रुपये मासिक भाड्याने देण्याचा प्रस्ताव महासभेसमोर होता. या प्रस्तावाला नगरसेवकांनीही विरोध केला. मिरज पंचायत समितीच्या सभेतही जागा देण्यास विरोध केला होता. वड्डी ग्रामस्थांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते.महासभेत वहिदा नायकवडी यांनी या विषयाला विरोध केला. तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी विषयपत्रात ताशेरे ओढले होते. तत्कालीन मिरज नगरपालिकेने १९९१ मध्ये ही जागा दिली. २००८ मध्ये शेड पाडून ही जागा महापालिकेने ताब्यात घेतली. आता कोणाला तरी खूश करण्यासाठी टेबलखालून हा विषय चर्चेला आणल्याचा आरोप केला. त्यावर आयुक्त नितीन कापडणीस यांनी हा आरोप फेटाळून लावला.भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी नायकवडी यांच्या आरोपावर आक्षेप घेतला. नायकवडी यांनी आरोप मागे घेऊन सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली. अखेर हारुण शिकलगार यांनी नायकवडींचे शब्द कामकाजातून काढून टाकावेत व सभेचे कामकाज पुढे सुरू करण्याची विनंती महापौरांना केली. त्यामुळे वादावर पदडा पडला.
सागर घोडके, अभिजित भोसले म्हणाले, घनकचरा प्रकल्प आराखडा मंजूर झाला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास ही जागा बदलून देण्याची अट घातली आहे. हा चुकीचा कारभार आहे. आराखडा अंमलबजावणी होऊ द्या, तोपर्यंत हा विषय प्रलंबित ठेवा. मात्र महापौर गीता सुतार यांनी बहुमताने हा विषय मंजूर केला. या ठरावाला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचेही समर्थन मिळाले.