सांगली : देशात सर्वत्र सुधारित नागरिकत्व विधेयकावरुन सुरू झालेल्या आंदोलनाने भाजपची डोकेदुखी वाढली असताना, आता सांगली जिल्हा भाजप अल्पसंख्याक युवा मोर्चानेच त्यांना घरचा आहेर दिला आहे. हे विधेयक रद्द न झाल्यास मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामा देऊन आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भाजप अल्पसंख्याक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम पन्हाळकर यांनी मंगळवारी यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक देऊन, स्वत:च्याच पक्षाला इशारा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नागरिक संशोधन बिल (सी.ए.बी.) आणि नॅशनल रजिस्ट्रेशन आॅफ सिटीझन (एन.आर.सी.) हे दोन्ही कायदे अल्पसंख्याकांवर अन्याय करणारे व भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आहेत. यामुळे देशाच्या एकात्मतेवर दूरगामी परिणाम होऊन देशाची एकता आणि अखंडतेला तडा देणारे आहे. हे बिल त्वरित रद्द करण्यात यावे, यासाठी आम्ही एकमताने विरोध करीत आहोत.
गृहमंत्री अमित शहा यांनी बिलास विरोध होत असल्याचे पाहून, बदल करण्याचे संकेत दिले आहेत. तरीही समाधानकारक बदल न झाल्यास व हा कायदा रद्द न झाल्यास भाजप अल्पसंख्याक मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्ते एकाचवेळी राजीनामा देतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासंदर्भातील बैठकीस पन्हाळकर यांच्यासह शेरु सौदागर, आश्रफ वांकर, इम्रान शेख, रज्जाक नाईक, इकलास बारगीर, पापा बागवान, उमर गवंडी, इजाज मेस्त्री, नबी मुजावर, महंमद जत्तीकर, युनुस कडलास्कर, शहानवाज फकीर, नईम शेख, अहमद शेख, आयुब पटेल, कय्युम शेख, लियाकत शेख आदी उपस्थित होते.
भाजपच्या अडचणी वाढल्याभाजपने अल्पसंख्याक समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन सांगली जिल्ह्यात पक्ष मजबुतीच्यादृष्टीने पाऊल टाकले होते. मात्र आता मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.