खंडाळा : वीज वितरण कंपनीचा बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार अक्षय कदम (रा. लोणी, ता. खंडाळा) याचा विजेचा झटका बसून विजेच्या खांबावरून पडल्याने मृत्यू झाला. याबाबत बेकायदेशीर काम करवून घेताना झालेल्या मृत्यूस जबाबदार धरून वीज मंडळाचे अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. संबंधितास तातडीने निलंबन करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने मोर्चा काढला.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली खंडाळ्यात मोर्चा काढण्यात आला. खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांना यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा येथील शिकाऊ उमेदवार स्वयंरोजगार सहकारी कामगार संस्थेच्या माध्यमातून अक्षय कदम हा वीज महामंडळाकडे शिरवळ विभागात कार्यरत होता. रविवार, दि. २६ रोजी बाह्यस्त्रोत कामगारास २२ केव्ही फीडरवर काम करण्यास सांगून आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरून वीज मंडळाचे उपअभियंता, सहायक अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची रितसर चौकशी करून तातडीने निलंबनाची कारवाई करावी. तसेच कामगार संस्थेच्या अध्यक्षाविरोधी कारवाई करून सदरच्या संस्थेचा परवाना रद्द करण्यात यावा.
याशिवाय अक्षय कदम हा घरातील एकमेव कर्ता होता. त्यामुळे त्याच्या बहिणीस सेवेत घेऊन त्या कुंटुबाला उदरनिवार्हाचा मार्ग मोकळा करावा तसेच या कुटुंबास तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी. याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही तर त्यापुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. मोर्चात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.