कुपवाड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य सोसायटी चौकात गणेशमूर्ती व सजावटीच्या साहित्याच्या विक्रीसाठी स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर बुधवारी सकाळी महापालिकेच्यावतीने जादा दराने जागा भाड्याची आकारणी करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेला शहरातील स्टाॅलधारकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यावेळी स्टॉलधारक आणि महापालिका कर्मचारी यांच्यात वादावादी झाली आहे.
कुपवाड शहरातील मुख्य सोसायटी चौकात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेश मूर्ती विक्री व सजावट साहित्यांच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे शहरातील व्यापारी वर्ग अडचणीत आहे. व्यापार पेठेत सध्या मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे छोट्या व्यापारी बांधवांनी उदरनिर्वाह चालवण्यासाठी विक्रीचे स्टॉल उभारले आहेत. हे स्टॉल शहरातील मुख्य बाजारपेठेत न उभारता अन्यत्र खुल्या जागेवर उभारण्यात यावेत.
यासाठी पोलिसांनी सक्ती केली होती. परंतु या सक्तीपूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यावर स्टॉल उभारले होते. दरम्यान, या स्टाॅलधारकांवर बुधवारी सकाळी महापालिकेच्या कर्मचारी यांनी अवाजवी दंडाची आकारणी करण्याची मोहीम राबवली. या मोहिमेत पाच हजारांपासून दहा ते पंधरा हजारांपर्यंत आकारणी करण्यात येत होती. या प्रक्रियेला शहरातील स्टॉलधारकांनी जोरदार विरोध दर्शवला. सध्या कोरोनाने सर्व व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच स्टॉलधारकांनी टोल विक्रीतून मिळणाऱ्या रकमेपेक्षा मनपाची दंड आकारणी जास्त आहे.
त्यामुळे महापालिकेने सुरू केलेली जादा रकमेची वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी यावेळी स्टॉलधारकांनी केली आहे. ही आकारणी वरिष्ठांच्या आदेशानुसार होत असल्याचे कर्मचारी यांनी सांगितले. यावेळी स्टाॅलधारक व अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. या आकारणीवर अधिकारी ठाम असल्याने नियमानुसारच वसुली करण्याचा पवित्रा अधिकारी यांनी घेतला. त्यामुळे संतापलेल्या स्टॉलधारकांनी आयुक्तांची भेट घेण्याबरोबरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी स्टॉलधारकांनी दिला आहे यावेळी स्टॉलधारक विजय खोत, दिनकर चव्हाण, रेवणनाथ व्हनकडे याच्यासह शहरातील असंख्य स्टॉलधारक उपस्थित होते.