कुपवाड : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील नवीन देशी दारू दुकानास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी जिल्हा सुधार समितीच्यावतीने मंगळवारी सकाळी महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांच्या विरोधात कुपवाड महापालिका कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रभाग कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरातील समस्यांबाबत सुधार समितीच्यावतीने प्रशासनाला अनेक निवेदने देण्यात आली आहेत. याबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच प्रभागात समस्यांचा महापूर असताना, नवीन दारू दुकानाला परवानगी देणे म्हणजे समस्यांमध्ये आणखी भरच पडणार आहे. याप्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. नागरिकांची नाराजी ओळखून समितीने तीव्र आंदोलन करण्याचा निश्चय केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी कुपवाड प्रभाग समिती कार्यालयासमोर सुधार समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, समस्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आंदोलकांनी हे निवेदन कार्यालयातील खांबाला लावले. तसेच याबाबत पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी निष्क्रिय नगरसेवकांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. आंदोलनामध्ये वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चोपडे, कल्पना कोळेकर, सुनील गिड्डे, मधुकर शेडबाळकर, सुनील पाटील, संध्याराणी दुधाळ, आसिफ मुजावर, अर्चना खोंदे, मुकुंद साबळे, नितीन सरोदे, पिराजी जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
कुपवाडला देशी दारू दुकानास विरोध
By admin | Published: April 18, 2017 11:19 PM