सांगली :प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत सभासदांच्या हिताचे काही नवीन पोटनियम मांडण्यात आले. बँकेची निवडणूक लढविण्याबाबतचा पोटनियम सभासदांशी तालुकावार संवाद साधून ‘जैसे थे’ ठेवण्यात आला. पण, आमच्यामुळेच पोटनियम मागे घेतल्याचा कांगावा विरोधकांकडून सुरू आहे. गतवर्षीच्या लाभांश वाटपाबाबतही विरोधकांनी अनेक आरोप केले. सहकार आयुक्तांच्या भेटीचा फार्सही केला. पण, खरी वस्तूस्थिती सभासदांसमोर मांडल्याने विरोधकांचे हे शस्त्र निकामी ठरल्याची टीका बँकेचे अध्यक्ष यू. टी. जाधव यांनी केली.
जाधव म्हणाले की, वार्षिक सभेत २०१९ -२० सालातील लाभांशाची रक्कम रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार भांडवली खाती सभासदांना भविष्यात फायदा होईल अशा ठिकाणी वर्ग करण्यास मंजुरी घेण्यात आली. पण, या विषयात विरोधी गटाच्या संचालकांनी सभासदांची दिशाभूल केली. सातारा व कोल्हापूर बँकेने भांडवली खाती जमा केल्याचे पुरावे सर्वांसमोर मांडल्याने त्यांचे ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ हे शस्त्र निकामी ठरले.
विरोधकांनी तात्त्विक व धोरणात्मक विरोध जरूर करावा, पण धादांत खोटे बोलून स्वतः व बँक बदनामीचा उद्योग बंद करावा. सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णय आमच्यामुळेच झाल्याचा कांगावा सुरू असल्याचे सांगितले.