सोनलगी ग्रामपंचायतीची निवडणूक अनेकवेळा बिनविरोध झाली आहे. यावेळी निवडणूक लागणार, हे निश्चित मानले जात आहे. विद्यमान सत्ताधारी गटाचे प्रमुख माजी सरपंच राजू पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी दोन्ही गटांची समजूत काढत बिनविरोध करण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष निगप्पा कळ्ळी प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधी पक्षाचे प्रमुख बी. के. पाटील यांनी निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गटांनी बिनविरोध निवडणूक न झाल्यास निवडणुकीची तयारी केली आहे. यामध्ये सत्ताधारी गटाने श्री. सिद्धरामेश्वर ग्रामविकास पॅनेल तयार केले असून, याचे नेतृत्व माजी सरपंच राजू पाटील, भीमू पांढरे, व्हणाप्पा कोळी, संगप्पा कळ्ळी, निगप्पा कळ्ळी, रवींद्र कांबळे, सिद्धापा कांबळे, म्हाळाप्पा कांबळे व प्रवीण व्हणेकर करत आहेत. विरोधात सिद्धरामेश्वर शेतकरी पॅनेल तयार असून यांचे नेतृत्व बी. के. पाटील, माजी सरपंच सुभाष मोरे, माजी उपसरपंच सिद्धू जाधव, आण्णाराया जगताप, लक्ष्मण मोरे व सुरेश कांबळे करत आहेत. ही निवडणूक अटीतटीची व रंगतदार होणार, हे निश्चित मानले जाते.
सोनलगी ग्रामपंचायतीसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:21 AM