सांगली : संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत असताना राज्यातील विरोधी पक्षाचे नेते महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे हे प्रयत्न फसले, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.ते म्हणाले की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून लोकशाहीची गळचेपी होत असल्याबाबात राज्यपालांकडे तथाकथीत विरोधी पक्षनेत्यांनी तक्रारीही केल्या. हे सरकार अस्थिर व्हावे, काही मोठे प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्यांना काहीतरी धडपड करता यावी यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यांचे हे उद्योग यशस्वी होऊ शकले नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे प्रयत्न फसले.राज्यात महाविकास आघाडीचे हे सरकार पुन्हा नव्या जोमाने काम करेल. कोरोनाविरोधातील लढाईत यशस्वी होणार आहे. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती करण्यासाठीसुद्धा सरकार सक्षम असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील.राज्यपालांकडे आम्ही दोनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवडीबाबत विनंती केली होती. विधानपरिषदेच्या निवडणुका पुढे गेल्याने आमच्यासमोर राज्यपाल नियुक्त दोन जागांशिवाय पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे ९ एप्रिलला प्रथम विनंती केली होती. मंत्रिमंडळाच्या ठरावासह केलेल्या मागणीस राज्यपालांचा प्रतिसाद मिळाला नाही. २८ मे पूर्वी विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका घ्याव्यात म्हणून निवडणूक आयोगाकडे मागणी केली, असे ते म्हणाले.>सुरक्षित अंतर ठेवून निवडणुका पार पाडल्या जाऊ शकतात, अशी खात्री दिली. त्यानंतर आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या पदासाठी निर्माण झालेली अडचण दूर झाली आहे, असे पाटील म्हणाले.
"महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा डाव फसला"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 5:15 AM