लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : जिल्ह्यात १९ जुलैनंतर पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले तर या निर्बंधांना विरोध करुन सर्व व्यावसायिकांसोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाैधरी यांना निवेदन देण्यात आले.
गत दीड वर्षात वारंवार लॉकडाऊन केल्यामुळे सामान्य माणूस बेरोजगार झाला आहे. पेट्रोल, डिझेल, डाळी, खाद्यतेल, गॅससह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सुरुच असल्याने सामान्य माणूस त्यात भरडला जात आहे. कामधंदा बंद असल्याने कोरोनामुळे नाही तर उपासमारीने लाेक मरत आहेत. आर्थिक कोंडी, उपासमारीचा परिणाम म्हणून मानसिक ताण-तणाव वाढून अनेकजण आत्महत्या करत आहेत. राज्य व केंद्र सरकार परस्परांवर टीका करत आहेत. केंद्र व राज्य शासनाने बँकेचे कर्ज, कर्जावरील व्याज, पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज व खाद्यतेलाची दरवाढ रद्द करावी. सर्व शासकीय वसुली, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ, दंडव्याज माफ करुन निर्बंध हटविण्यासह जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत. दि. १९ जुलैनंतर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा निर्णय झाला, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे निर्बंधांना विरोध करुन सर्व व्यावसायिकांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, उमरफारूक ककमरी, चंद्रकांत खरात, संजय कांबळे, अशोक लोंढे, प्रशांत कदम, प्रशांत वाघमारे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, कुमार कांबळे, अनिल मोरे, दीक्षांत सावंत, मिलिंद कांबळे, सागर आठवले, सिध्दार्थ लोंढे, शरद वाघमारे, ऋषिकेश माने उपस्थित होते.