विकास शहा / लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा येथील शेतकरी जयसिंगराव शिंदे यांनी चक्क बांधावर सातशेवर झाडे लावून आदर्श निर्माण केला आहे. येथील जयसिंगराव शिंदे यांनी १९९५ पासून शेताच्या बांधावर हापूस, पायरी, नीलम, केसर, सिंधू, मडगोबा, इंग्लिश कोलम, आदी जातींची ३५० आंब्याची झाडे लावली आहेत. मडगोबा आंबे तर एक ते सव्वा किलोपर्यंत वजनाचे आहेत. यातून दीड ते दोन लाखांचे उत्पन्नही मिळते. सीताफळ, रामफळ, हनुमानफळ, चिक्कू यांचीही झाडे लावली आहेत. या फळझाडांसह सागवान, ऑस्ट्रेलियन साग, बाभळ, आफ्रिकन साग यांचीही १०० झाडे आहेत. शेती उत्पन्नाबरोबरच या बांधावरील उत्पन्न देणाऱ्या झाडांची शेती पाहण्यासाठी शेतकरी येत आहेत. या झाडांमुळे निसर्गाचा समतोल राखला जातो.
चौकट
देशात कमीत कमी पिकाऊ शेतजमिनीपैकी ६ ते ८ टक्के जमीन बांधासाठी वापरली जाते. या बांधांच्या हद्दीवरून वाद, खून होत आहेत. या बांधांचा झाडे लावण्यासाठी उपयोग केल्यास वाद कमी होतील, आर्थिक उत्पन्न वाढेल, तसेच पर्यावरण संवर्धनही होणार आहे.
- जयसिंगराव शिंदे, प्रगतशील शेतकरी, शिराळा