जयवंत आदाटे ।जत : जत तालुक्यातील ९ हजार ९९०.४९ हेक्टर क्षेत्रातील जिरायत व बागायत आणि फळपिकांचे अवकाळी पावसामुळे सुमारे १३ कोटी ८५ लाख रुपये इतके नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. पंचनामा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याला आणखी मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तालुक्यात फळबागांचे ५ हजार १६८.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रति हेक्टर १८ हजार रुपयेप्रमाणे ९ कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिरायत पिकांचे २ हजार ९०५.५३ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपयेप्रमाणे १ कोटी ९७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बागायती पिकांचे १ हजार ९१६.६५ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. प्रति हेक्टर १३ हजार ५०० रुपयेप्रमाणे २ कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र ८९ हजार १२१.९ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ४९ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ७ हजार ९०० शेतकऱ्यांचे ४१ हजार १००.५० हेक्टर क्षेत्रातील तूर, मका, हरभरा, भुईमूग, गहू, बाजरी, कांदा आदी पिकांचे व द्राक्ष आणि डाळिंब फळबागांचे १३ कोटी ८५ लाख रुपयांचे नुकसान अवकाळी पावसाने झाले आहे.
जत तालुक्यातील ३ हजार ९९२ शेतकºयांचे २ हजार २५७.५० हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे, तर ३ हजार ९०८ शेतक-यांचे १ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माडग्याळ, शेगाव, जत, उमदी, संख, बिळूर गावांसह सीमाभागातील पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचून राहिल्यामुळे शेतकºयांच्या नुकसानीचा आकडा वाढला आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. सर्वसाधारण ६५ ते ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भयंकर दुष्काळ व अवकाळी नुकसानीचे प्रमाण मोठे आहे.जून व जुलै महिन्यातील नुकसानीची भरपाई शेतक-यांना मिळणार आहे. यानंतरच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात शासनाने आपली भूमिका व धोरण जाहीर करावे, अशी शेतकºयांची मागणी आहे.
शेतक-यांना २००९ मधील नुकसानभरपाई मिळाली नाही. यावेळी मुख्य लाभार्थ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे.