सांगली : अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने घेतलेल्या कामांची झाडाझडती करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिले. स्थायी सभेच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
गेल्यावर्षी अनेक ठेकेदारांनी अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने कामे घेतली. त्यातील बरीच कामे अजूनही पूर्ण झाली नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. त्यामुळे त्यांच्या चौकशीचे आदेश कोरे यांनी दिले. किती कामे पूर्ण झाली, किती कामे रखडली आहेत? कामे रखडण्याची कारणे काय? याची माहिती पुढील सभेपर्यंत देण्यास सांगितले. म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण जिल्ह्यात वाढत आहेत, त्या तुलनेत अैाषधे पुरेशी उपलब्ध नसल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यासाठी शासनाकडे जास्तीतजास्त मागणी नोंदविण्याचा निर्णय झाला. अनेक ग्रामपंचायती कोरोनाबाधित सापडलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यास टाळाटाळ करत आहेत? याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. अशा ग्रामपंचायतींना सूचना देण्यात येणार आहेत. कोरोना काळात गावपातळीवर आशा कार्यकर्त्या चांगले काम करत आहेत, पण त्यांना ग्रामपंचायतींकडून भत्ता वेळेत मिळत नसल्याची तक्रारही सदस्यांनी केली. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींना भत्ता वेळेत अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चौकट
लसीकरणात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
कोरोना लसीकरणामध्ये सांगली जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे. रविवार अखेर साडेसहा लाख डोस देण्यात आले आहेत. त्याबद्दल प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव झाला.