लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गाचे पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटादरम्यान प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
बैठकीत राष्ट्रीय महामार्ग क्र. २६६ अंतर्गत पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटादरम्यानचे रखडलेले महामार्गाचे काम उपलब्ध जागेत सात मीटर रुंदीने काँक्रिटीकरण करून तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले असून, यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.
डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकारातून तुपारी फाटा ते येळावी फाटादरम्यान महामार्गाची रखडलेच्या कामासंदर्भात चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार, राष्ट्रीय महामार्ग सचिव विनय देशपांडे तसेच अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी भाग घेतला. पलूस तहसील कार्यालयातून जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, जे. के. बापू जाधव, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, वैभवराव पुदाले, आदी उपस्थित होते.
विजापूर - गुहागर महामार्गाचे पलूस तालुक्यातील १६ कि.मी. अंतराचे काम रखडले आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या मार्गावर सतत लहान-मोठे अपघात होत आहेत. अपघातात काहीजणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी भूमिका डॉ. कदम यांनी यावेळी मांडली.
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यावर न्यायालय जो निर्णय देईल, त्याला अधीन राहून त्याप्रमाणे भविष्यात काम करता येईल, मात्र तोपर्यंत थांबून चालणार नाही. सध्या उपलब्ध जागेत सात मीटर रुंदीने तत्काळ रखडलेले काम सुरू करावे. तुपारी फाटा आणि येळावी फाटा या दोन्ही बाजूंकडून काम सुरू करावे. म्हणजे काम लवकर पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. यासाठी शेतकरी, नागरिक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.