सांगली : आरग येथील विहिरींची कामे रखडल्याप्रकरणी सोमवारी अहवाल सादर करण्याचे आदेश मिरजेच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी पत्र जारी केले.
आरग येथील मीनाक्षी पाटील, वसंत माने व लीलाबाई आरगे या शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून विहिरी मंजूर झाल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २०१५मध्ये कार्यारंभ आदेश मिळाला. काम सुरू झाल्यानंतर तांत्रिक त्रुटी काढून ती बंद ठेवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे लाभार्थींनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली. त्याची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश मिरजेच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते; पण तो मिळाला नाही, त्यामुळे गुरुवारी (दि. १८) पुन्हा नव्याने आदेश काढण्यात आले.
या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, दोषी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी आणि त्याचा अहवाल सोमवारी सादर करावा, असे गावडे यांनी आदेशात म्हटले आहे.