सांगली : कोरोनाची लस जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. लसीकरणाच्या पूर्वतयारीच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज उच्चस्तरीय व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या टास्क फोर्सचा आढावा यावेळी घेण्यात आला. महापालिकेने स्वतंत्र फोर्स स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.
लसीकरणासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय टास्क फोर्स स्थापन केले आहेत. त्याच धर्तीवर महापालिकेलाही फोर्स स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. तो अद्याप स्थापन केला नसल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिली. महापालिका स्तरावर त्याची स्वतंत्र स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, लसीकरणामध्ये सर्व शासकीय व खासगी डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. त्यासाठी संकेतस्थळावर माहिती भरण्याचे काम सुरू आहे. खासगी डॉक्टरांनीही माहिती त्वरित भरण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
-------------