सांगली : बलगवडे (ता. तासगाव) येथे जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली म्हणून पोलिसात ॲट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून नंतर फितूर होणाऱ्या फिर्यादीवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले. यासह त्याला मिळालेल्या दीड लाख रुपयांच्या अनुदानाची रक्कमही वसूल करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. पाटील यांनी हे आदेश दिले. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले.फिर्यादी प्रदीप विक्रम रास्ते (वय २३, रा. बलगवडे) याने सौरभ रावसाहेब शिंदे याच्याविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. शिंदे याने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचे व भांडण सोडविण्यास पत्नी आली असता, तिलाही ढकलून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे रास्ते याने म्हटले होते. यानुसार शिंदे याच्यावर ॲट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर फिर्यादी रास्ते याने शिंदे याच्याशी संगनमत करून आरोपीला मदत होईल असा जबाब दिला. फिर्यादी रास्तेने शिंदे याच्याकडे दारूसाठी पैसे मागितले, पण शिंदेने पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून रास्तेने शिंदेविरोधात खोटी फिर्याद दिल्याचे उलट तपासात मान्य केले. तसेच घरासमोर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे खोटे सांगत असल्याचेही मान्य केले. यामुळे फिर्यादी रास्तेने न्यायालयासमोर शपथेवर खोटी साक्ष दिल्याचे सिद्ध झाले.फिर्यादी फितूर होऊन खोटी साक्ष दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्याबाबत युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. न्यायालयीन कामकाजासाठी वापरली जाणारी यंत्रणा, वेळ याचा विचार करता फिर्यादी फितूर झाल्याने उद्देशच साध्य होत नाही, असा युक्तिवाद जमादार यांनी केला. यानंतर रास्ते याच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले.
अनुदानाच्या वसुलीचे आदेशॲट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीस दीड लाख रुपयांची मदत शासनाकडून मिळाली होती. ही रक्कमही त्याच्याकडून वसूल करण्याचे आदेशात म्हटले आहे.