सांगली : मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी दुर्वे यांची दोन मुले महापालिकेत मानधनावर कार्यरत असल्याची बाब गुरुवारी स्थायी समिती सभेत उजेडात आली. यावरून सदस्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर या दोन्ही मुलांना निलंबित करण्याचे आदेश सभापती धीरज सूर्यवंशी यांनी दिले.महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी सभापती सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली कुपवाड येथील विभागीय कार्यालयात पार पडली. मिरजेतील नगरसेवक शिवाजी दुर्वे यांची दोन मुले महापालिकेत मानधनावर नियुक्त असून, ती कामावर नसतात, अशी तक्रार यावेळी करण्यात आली. याची दखल घेत सभापतींनी याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यासाठी काही काळ सभा तहकूब ठेवली. नगरसेवकांची मुले महापालिकेत कामावर कशी, असा सवाल निरंजन आवटी यांनी उपस्थित केला. संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश सूर्यवंशी यांनी दिले.महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पासाठी साठ कोटींचा निधी राखीव ठेवला आहे; पण यातील १८ कोटी रुपये शासनाकडे परत गेल्याचा मुद्दा ॲड. स्वाती शिंदे यांनी सभेत मांडला. याप्रकरणीही अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले. चौदाव्या वित्ती आयोगातील निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचनाही दिल्या.जिल्हा नियोजन समिती व समाजकल्याण समितीकडील कामांच्या निविदा झालेल्या असून, दरमान्यता व कार्यादेश देण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबरला विशेष शिबिर घेण्याचा निर्णय सभापतींनी घेतला. गॅस पाइपलाइन खोदाई केलेल्या कंपनीने काही ठिकाणी बेकायदा खोदाई केल्याची तक्रार सदस्यांनी केली. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले. याबाबत राजेंद्र कुंभार, प्रकाश ढंग यांनी आवाज उठवला.
कुपवाडच्या सभेत कुपवाडचे विषय प्रलंबितसभेत कुपवाडचे अनेक प्रश्न विषयपत्रिकेवर घेण्यात आले होते. कुपवाड प्रभाग क्रमांक तीनमध्ये मुरूमीकरण, मदनभाऊ पाटील स्टेडियमला कंपाऊंड व कार्यालय, चिल्ड्रन पार्क या प्रमुख विषयांना सभेत मान्यता मिळेल, अशी अपेक्षा कुपवाडकरांना होती, मात्र हे महत्त्वाचे तिन्ही विषय प्रलंबित राहिले.