मिरज : महामार्गालगत असलेली दारू दुकाने व परमिट रूम सुरू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानांवरील फलक हटविण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यावरील दुकाने बंद करण्याऐवजी दारूची जाहिरात करणारे फलक हटविण्यात येत असून, यापुढे दारू दुकानांवर केवळ परवानाधारकाच्या नावाचे फलक लावण्यात येणार आहेत.
गतवर्षी न्यायालयाच्या आदेशाने राज्य महामार्ग व राष्टÑीय महामार्गालगत असणारी देशी, विदेशी दारू दुकाने बंद केली होती. न्यायालयाच्या आदेशाने ही दुकाने पुन्हा सुरू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानावरील दारूची जाहिरात करणारे फलक हटविण्याचे आदेश दिले आहेत. उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी यांनी राज्यातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री करणारी दुकाने व परमिट रूमचे फलक हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यापुढे मद्य विक्री परवानाधारकाने दुकानावर ९० सेंटीमीटर लांब व ६० सेंटीमीटर रूंदीचा छोट्या आकारातील फलक लावून त्यावर अनुज्ञप्ती क्रमांक व स्वत:चे नाव लिहावयाचे आहे. मद्याच्या ब्रॅन्डचे जाहिरात फलक, साईनबोर्डस्, फ्लेक्स, निआॅन साईन फलक लावण्यास बंदी केली असून फलकावर मद्याचा कोणताही उल्लेख असणार नाही. असे न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून शहरातील देशी, विदेशी दारू दुकानांवरील फलक हटविण्यात आले आहेत. दुकानातील मद्याच्या बाटल्या व फलकावरील परवाना क्रमांकावरूनच मद्यपींना परमिट रूम व बिअरबार शोधावे लागणार आहेत.कर्नाटक सीमेवरील दुकाने बंदकर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील सीमेवरील गावातील देशी व विदेशी मद्याची दुकाने तीन दिवस बंद केली आहेत. शनिवार, दि. १२ रोजी कर्नाटकात मतदान होईपर्यंत दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मिरज तालुक्यातील म्हैसाळ, बेडग, आरग, शिंदेवाडी, खटाव, सलगरे, जत तालुक्यातील गिरगाव, जिरग्याळ, उमराणी, कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील ३५ दारू दुकानांना अधिकाºयांनी सील ठोकले आहे.