सांगली : कोरोना रुग्णाकडून अवाजवी घेतलेल्या बिलापैकी २२ हजार रुपये सात दिवसांत परत करण्याचे आदेश महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिले. सांगली-मिरज रस्त्यावरील एका खासगी कोविड रुग्णालयाने जास्त बिल आकारणी केल्याची तक्रार संभाजीराव सावंत (वसंत कॉलनी, सांगली) यांनी केली होती.
सावंत यांना या रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती सामान्य होती. अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज नव्हती, तरीही रुग्णालयाने अतिदक्षतामध्ये ठेवले. ऑक्सिजन न लावताच प्रतिदिनी सात हजार रुपयांप्रमाणे बिल आकारणी केली. सावंत यांनी डिस्चार्जनंतर बिलाविषयी महापालिका आयुक्त तसेच कोविडच्या लेखा विभागाकडे तक्रार दाखल केली.
लेखा विभागाच्या पाहणीअंती रुग्णालयाने ८ हजार ९३ रुपये अतिरिक्त आकारल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा कोषागार अधिकारी तथा सनियंत्रण व समन्वय अधिकाऱ्यांनी अतिरिक्त रकमेच्या वसुलीसाठी नोटीस दिली असता रुग्णालयाने ते परत करण्याचे मान्य केले. सावंत यांनी या रकमेसह रुग्णालयाने नियमबाह्यरीत्या आकारलेले १२ हजार रुपये आणि मानसिक त्रास झाल्याबद्दल ५० हजार रुपये भरपाई असे ७० हजार ९३ रुपये मागितले.
आयुक्त कापडणीस यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी सुनावणी घेतली. रुग्णालयाने चार दिवसांचा दैनंदिन खर्च प्रत्येकी साडेसात हजार रुपयांप्रमाणे तीस हजार रुपये घेतला. वास्तविक यासाठी दररोज ४ हजारांनुसार १६ हजार रुपये घेणे अपेक्षित होते. त्यामुळे लेखा विभागाने आक्षेप घेतलेले ८ हजार ९३ रुपये व दैनंदिन खर्चाचे अतिरिक्त १६ हजार रुपये असे २२ हजार ९३ रुपये सात दिवसांत सावंत यांना परत करण्याचे आदेश उपायुक्त पाटील यांनी रुग्णालयाला दिले. पैसे परत केले नाही तर कारवाईचा इशाराही दिला.
चौकट
ऑक्सिजन न लावताच पैसे घेतले
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष चोपडे व डॉ. अक्षय पाटील यांनी अहवालामध्ये नोंदविले की, रुग्ण रुग्णालयात दाखल असेपर्यंत ऑक्सिजन पातळी कधीही खालावली नव्हती. त्यांची प्रकृती स्थिर होती, तरीही अतिदक्षता विभागात दाखल केल्याचे चार्टवरून दिसते.